पूरग्रस्तांना घरपट्टीत ५० टक्के माफी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:30 AM2021-08-21T04:30:56+5:302021-08-21T04:30:56+5:30
सांगली : शहरातील पूरबाधित नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी करात सवलत देण्याची मागणी भाजपचे शेखर इनामदार, ॲड. स्वाती शिंदे यांनी ...
सांगली : शहरातील पूरबाधित नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी करात सवलत देण्याची मागणी भाजपचे शेखर इनामदार, ॲड. स्वाती शिंदे यांनी शुक्रवारी महासभेत केली. याबाबत लवकरच विशेष महासभा घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.
महापालिकेच्या सभेत सौरऊर्जा, रेन हार्वेस्टिंग, गांडूळ प्रकल्प, सांडपाण्याचा निचरा, घरातील कचऱ्याचे विल्हेवाट आदींपैकी तीन निकष पूर्ण करणाऱ्या मालमत्ताधारकांना करात सूट देण्याचा विषय चर्चेला आला होता. कर अधीक्षक पराग कोडगुले यांनी या योजनेंतर्गत ४ टक्के करात सूट दिली जात आहे. शहरातील ३७३ घरांना सवलत मिळत असल्याचे सांगितले. ॲड. स्वाती शिंदे यांनी प्रशासनाकडून कागदावरच जनजागृती करीत असल्याचा आरोप केला, तसेच पूरबाधित घऱांना घरपट्टी, पाणीपट्टीत सूट देण्याची मागणी केली.
शेखर इनामदार म्हणाले की, २०१९ पासून शहरातील नागरिक संकटांना तोंड देत आहेत. पूरग्रस्त नागरिकांना ५० टक्के करमाफी दिली जावी. त्यासाठी विशेष महासभा घेऊन निर्णय घ्यावा.
महापौर सूर्यवंशी यांनीही पंधरा दिवसांत सभा घेण्याची ग्वाही दिली.
चौकट
नाल्याच्या ठरावाला विरोध
चैत्रबन नाल्यासाठी दहा कोटी मंजूर झाले होते. या निधीतून आठ नाले बांधण्याचा ठराव महापौरांनी गतसभेत केला होता. त्याला काँग्रेसचे संतोष पाटील यांनी लेखी विरोध केला.