बांधकाम कामगारांना आणखी साडेआठ हजारांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:26 AM2021-04-27T04:26:54+5:302021-04-27T04:26:54+5:30
सांगली : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून ११ हजार कोटी रुपये जमा आहेत. या निधीतून प्रत्येक कामगाराला पूर्वी ...
सांगली : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकराच्या माध्यमातून ११ हजार कोटी रुपये जमा आहेत. या निधीतून प्रत्येक कामगाराला पूर्वी दीड हजार दिले आहेत. पण, एवढ्यावर थांबून चालणार नाही. गेल्या दोन महिन्यापासून त्यांचे काम बंद असल्यामुळे आणखी साडेआठ हजार रुपये कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक कॉ. शंकर पुजारी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील १५ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी १३ एप्रिल रोजी बांधकाम सहित इतर असंघटित उद्योगातील कामगारांसाठी पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्याचे घोषित केले आहे. यामध्ये नोंदीत बांधकाम कामगार यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांतर्फे प्रत्येकी दहा हजार रुपये मिळावेत अशी मागणी केलेली होती. कारण सध्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकारामधून ११ हजार कोटी रुपये जमा आहेत. त्यामुळे नोंदणीकृत १५ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये देणे महाराष्ट्र शासनाला सहज शक्य होणार आहे. पूर्वीचे दीड हजार वजा करुन उर्वरित साडेआठ हजार रुपये रक्कम नोंदीत बांधकाम कामगारांना देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने व कल्याणकारी मंडळामार्फत त्वरित निर्णय करावा, अन्यथा न्यायी हक्कासाठी आंदोलन करावे लागले, असा इशाराही कॉ. पुजारी यांनी दिला.
चौकट
दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती थकीत
बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती द्यावी, कारण मागील तीन वर्षांपासून राज्यातील लाखो बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती अजूनही या कल्याणकारी मंडळाने दिली नाही. बांधकाम कामगारांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांना योग्य प्रकारे लाभ द्यावेत. बांधकाम कामगारांच्या घर बांधण्यासाठी अनुदान मिळाले नाही. परंतु याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बंद आहे, असा आराेपही कॉ. पुजारी यांनी केला.