निधी मिळण्यासाठी भाजपला सत्ता द्या
By admin | Published: January 11, 2017 11:47 PM2017-01-11T23:47:31+5:302017-01-11T23:47:31+5:30
चंद्रकांत पाटील : चिंंचणीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक
देवराष्ट्रे : आमदारकीपेक्षा जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत महत्त्वाची आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य सरकारचा निधी थेट मिळणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. विकास करण्यासाठी निधी पाहिजे असल्यास जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चिंचणी (ता. कडेगाव) येथे देवराष्ट्रे जि. प. गटातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संपर्कप्रमुख मकरंद देशपांडे, कृष्णा कारखान्याचे संचालक पांडुरंग मोहिते, राजाराम गरूड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी केंद्रीय योजना थेट ग्रामपंचायतीला, पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये देण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमदार होण्यापेक्षा ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यातच खरी मजा असल्याचेही त्यांनी सांगितले. तलाठी, मंडल अधिकारी यांच्या त्रासापासून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्त करण्यासााठी राज्य शासनाने सात-बारा संगणकीकृत करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यानुसार बुधवारीच वर्धा आणि नाशिक या दोन जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ केला असल्याचेही सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, कदम यांच्याकडे विधानसभा व विधानपरिषदेची आमदारकी आहे. पण लोकांची कामे करताना चेहरे बघून के ली जातात. विकास पाहिजे असल्यास भाजपच्या हाती सत्ता द्या. कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी तालुका अध्यक्ष हिम्मत देशमुख, सुरेश यादव, धोंडीराम महिंद, माणिक मोरे, तानाजी महिंद, दशरथ भोंगाळे, पांडुरंग जमदाडे, पपिता सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. (वार्ताहर)