कवठेमहांकाळमध्ये दुकानगाळे अनामतसाठी मुदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:44+5:302021-02-26T04:38:44+5:30
कवठेमहांकाळ : कोरोनाच्या काळातील वाढीव अनामत रकमेच्या आकारणीबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत कोरोना काळातील अनामत रकमेबाबत दुकानगाळाधारकांना ...
कवठेमहांकाळ : कोरोनाच्या काळातील वाढीव अनामत रकमेच्या आकारणीबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत कोरोना काळातील अनामत रकमेबाबत दुकानगाळाधारकांना सवलत द्यावी, अशी विनंती खासदार संजयकाका पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे नेते हायुम भाई सावणूरकर यांनी दिली.
नगरपंचायतीने दुकानगाळ्यांची अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याच्याविरोधात दुकानगाळेधारकांनी भाजपचे हायुम सावणूरकर, रणजित घाडगे, महावीर माने यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी खासदार संजयकाका पाटील यांची हायुम सावणूरकर, दादासाहेब कोळेकर, विशाल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दुकानगाळे धारकांनी भेट घेतली व त्यांचे प्रश्न खासदारांपुढे मांडले.
खासदार पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. वाढीव अनामतीबाबत आपण जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटून चर्चा करणार आहोत. याबाबत काही मार्ग निघतो का, ते पाहणार आहे. तोपर्यंत थोडीशी सवलत द्यावी. कोरोनाकाळात लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. तसेच परत कोरोनाची महामारी डोके वर काढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना थोडीशी सवलत द्यावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली.
शिष्टमंडळात हायुम सावणूरकर, दादासाहेब कोळेकर, रणजित घाडगे, शिवसेनेचे संतोष भोसले, अमोल जाधव, महावीर माने, नगरसेवक विशाल वाघमारे, आदी सहभागी होते.