शिराळा-वाळव्यास दुष्काळाच्या सवलती द्या

By admin | Published: November 6, 2015 11:43 PM2015-11-06T23:43:13+5:302015-11-06T23:54:25+5:30

रणधीर नाईक : अंत्री बुद्रुकमधून शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह पदयात्रा

Give drought relief to shrimp and desert | शिराळा-वाळव्यास दुष्काळाच्या सवलती द्या

शिराळा-वाळव्यास दुष्काळाच्या सवलती द्या

Next

कोकरूड : शिराळा व वाळवा तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम वाया गेला असून, या गावांना दुष्काळाच्या सवलती मिळाव्यात. येथील शेतकऱ्यांवर विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने वस्तुनिष्ठ अहवाल पाठवावा. आम्ही शासनविरोधी नाही. मात्र गरज पडल्यास शासनाविरोधात तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी शुक्रवारी दिला.
अंत्री बुद्रुक ते शिराळा तहसील कार्यालय अशी साडेसात ते आठ किलोमीटरची पदयात्रा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. कार्यालयापुढे यावेळी पदयात्रेसाठी जमलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर नाईक बोलत होते.
सकाळी दहा वाजता पदयात्रेस प्रारंभ झाला, तर दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर विसर्जन झाले. यावेळी सुखदेव पाटील, अ‍ॅड. बाबालाल मुजावर, विजय पाटील साखराळकर, प्रकाश पाटील, विजय कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
नाईक म्हणाले, यावर्षी शिराळा तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. प्रारंभी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाला नजरपाहणी अहवाल अत्यंत निष्काळजीपणे पाठवला आहे. त्यामुळे शासनाच्या निकषात शिराळा, वाळवा तालुका बसला नाही. शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठार, मेणी, येळापूर विभाग, काळुंद्रे व पणुंब्रे खोरा, शिंदेवाडी, संपूर्ण उत्तर विभाग व वाळवा तालुक्याच्या महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूची काही गावे पूर्णत: अवर्षणग्रस्त आहेत.
महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर न जाता कार्यालयात बसून चुकीचा नजर पाहणी अहवाल शासनाला पाठविण्याचे पाप केल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे. शासनाने यावर्षी प्रथमच इंग्रज राजवटीच्या काळातील दुष्काळाचे निकष बदलून ५० टक्केऐवजी ६७ टक्के पिके आलेल्या गावात दुष्काळ जाहीर करावा, असा नवा निकष आणला आहे. त्यामुळे या निकषात शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्व अवर्षणग्रस्त गावांना दुष्काळी सवलतींचा लाभ होणार आहे.
नाईक म्हणाले, महसूल विभागाने यापूर्वी केलेली चूक पुन्हा करू नये. नाही तर शेतकरी तुम्हाला त्रास दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशारा दिला. दुष्काळात असणाऱ्या सर्व सवलतीसह सोयी-सुविधा मिळाव्यात व जलयुक्त शिवार योजनेत दुष्काळी गावाचा समावेश व्हावा, अशा मागणीचे निवेदन शिराळा तहसीलदारांना पहिल्यांदा आमच्याकडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर अवर्षणग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या सलग पंधरा दिवस बैठका घेतल्या व दुष्काळाबाबत त्यांच्यामध्ये जागृती केल्यामुळेच पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी संचालक आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, उत्तम निकम, महेश पाटील, सुकुमार पाटील, संभाजी पाटील, दिनकर पाटील, पांडुरंग पाटील, एम. सी. पाटील, शंकर पाटील, संपत पाटील, दीपक खराडे, विश्वास पाटील, महादेव जाधव, सुनील पाटील, जयवंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकरी हवालदिल : प्रशासनाला जागे करणार
नाईक म्हणाले, ही पदयात्रा शासनाविरोधात नाही, मात्र सुस्तावलेल्या भ्रष्ट प्रशासनाला जाग आणण्यासाठी ही पदयात्रा आहे. महसूल विभागात काम करणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. यंदा शेतकरी दुष्काळामुळे प्रचंड हवालदिल झाला आहे. मात्र प्रशासनाने शासनाला चुकीचा अहवाल पाठवला आहे. आता तरी झाकलेले डोळे उघडा आणि पीक कापणीचा, नंतर येणाऱ्या उत्पन्नाचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवा. जर असे झाले नाही, तर प्रथम प्रशासनाविरुद्ध व नंतर शासनाविरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करू.

Web Title: Give drought relief to shrimp and desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.