पुरावा द्या, राजकीय संन्यास घेतो : पृथ्वीराज देशमुख
By admin | Published: June 26, 2016 01:00 AM2016-06-26T01:00:00+5:302016-06-26T01:00:00+5:30
अजित गुलाबचंदसह अन्य लोकांना अटक करा
सांगली : मी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट केल्याचा विरोधकांकडे पुरावा असेल, तर तो त्यांनी सादर करावा. तो सिद्ध झाल्यास कायमचा राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटीच्या एका गटाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले.
ते म्हणाले की, तत्कालीन मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी न्यायालयात सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार पोलिसांनी पर्यायाने शासनाने वालचंद ग्रुपचे अजित गुलाबचंद, रवींद्र पुरोहित यांच्यासह अन्य सहकाऱ्यांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही आता करणार आहोत. रजपूत यांनी १४ जून २0११ रोजी चौकशी अहवाल जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार अजित गुलाबचंद यांच्यासह अन्य लोकांवर कागदपत्रांची आणखी छाननी करून अटक करावी, असा अहवाल दिला आहे. या अहवालाची प्रत आम्हाला मिळाली आहे. बनावट संकेतस्थळ निर्माण करण्यापासून अनेक नियमबाह्य गोष्टी त्यांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. विजय पुसाळकर यांचा सोसायटीशी काहीही संबंध नाही. जमीन हडपण्यासाठी वापरलेले ते एक प्यादे आहे. सोसायटीवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळविण्यासाठीच त्यांनी सभेचा गोलमाल केला. एकाच सभेत राजीनामा, दुसऱ्या अध्यक्षाची निवडही केली. राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर राज्यातील नावाजलेले अभियांत्रिकी महाविद्यालय यशस्वीपणे चालविण्याचा अनुभव असल्याने मला एमटीईवर संधी मिळाली आहे. येथे येतानाच राजकीय जोडे बाहेर काढलेले आहेत. कायदेशीररीत्या मी या सोसायटीचा सभासद असल्यामुळे माझ्या पदनियुक्तीबाबत कोणतीही शंका कोणी उपस्थित करू शकत नाही. (प्रतिनिधी)
निकालाची अपेक्षा
धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेल्या तक्रारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय लवकर अपेक्षित आहे. त्यातूनच खरे सत्य बाहेर येईल, असे दीपक शिंदे म्हणाले.
दोघातील वाद पक्षाकडे...
खासदार संजय पाटील आणि माझ्यातील वाद संस्थेविषयी आहे. वैयक्तिक किंवा पक्षीय स्वरूप त्याला दिलेले नाही. तरीही या वादानंतर पक्षाला एक अहवाल पाठविला आहे. याप्रकरणी नि:पक्षपातीपणाने चौकशी करून आदेश द्यावेत, अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली आहे. पक्षाने किंवा कोणीही माझी बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही. सत्यतेनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
एका मिनिटात घरी जातो
धर्मादाय आयुक्त, न्यायालय किंवा शासन यापैकी कोणीही माझी निवड बेकायदेशीर ठरविली तर एका मिनिटात निमूटपणे घरी जायला मी तयार आहे, असे देशमुख म्हणाले.
तीन हजार कार्यकर्ते जमले होते
संजयकाका पाटील यांनी केलेल्या दडपशाहीनंतर माझ्या घरी तीन हजार कार्यकर्ते प्रत्युत्तर देण्यासाठी जमले होते. त्यांना मी घरी जाण्यास सांगितले. बळाचाच वापर करायचा झाला, तर कधीही केला असता; मात्र आम्हाला या संस्थेत कायद्याचा वापर करायचा आहे, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.