शेतकऱ्यांना कर्जात सूट देत पर्याय द्यावा
By admin | Published: April 9, 2017 11:42 PM2017-04-09T23:42:36+5:302017-04-09T23:42:36+5:30
सी. रंगराजन : अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार प्रदान सोहळा
सातारा : ‘देशाच्या वाढत्या आर्थिक स्तरासाठी विद्यमान सरकारने तातडीने काही ठोस आणि योग्य निर्णय घेतले पाहिजेत. तरच देशातील दोन राहणीमानातील दरी कमी होऊन चांगला विकास साधता येईल. तसेच सध्या गाजत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जरी पूर्ण कर्जे माफकरता आली नाहीत तरी काही मदत देऊन कर्जात काही प्रमाणात सूट देत पर्याय द्यावा,’ असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर पद्मविभूषण डॉ. सी. रंगराजन यांनी व्यक्त केले.
सातारा येथील कै. वा. ग. तथा अण्णासाहेब चिमुले चॅरिटेबल ट्रस्टतर्फेदिला जाणारा मानाचा ‘वा. ग. चिरमुले’ पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर पद्मविभूषण डॉ. सी. रंगराजन यांना येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या सभाहगृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील तसेच विश्वस्त अरुण गोडबोले, श्रीकांत जोशी, अर्थतज्ज्ञ पी. एन. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. रंगराजन यांनी ‘स्पीडिंग अप इकॉनॉमिक ग्रोथ’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. रंगराजन म्हणाले, ‘मी हा चिरमुले पुरस्कार मोठ्या आनंदाने स्वीकारत आहे. देशाला ललामभूत ठरणाऱ्या आणि २० व्या शतकाच्या प्रारंभी बँका आणि विमा क्षेत्रात अशा संस्था सुरू करणे, वाढवणे ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याला मी आदरांजली वाहतो. २०१४ ते २०१५ सालापासून ढासळत जाणार ग्रोथ रेट कमी करण्यासाठी नियोजनपूर्वक गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.’
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘डॉ. रंगराजन यांची पुरस्कारासाठी निवड ही अचूक असून, हा १९ वा पुरस्कार प्रदान करताना मला मोठा आनंद वाटतो आहे. रंगराजन यांच्यासोबत मला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली आहे.’
मद्रास स्कूलआॅफ इकॉनॉमिस्टचे स्वामीनाथन, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, आ. आनंदराव पाटील, उदाजीराव निकम, विश्वास दांडेकर, प्राचार्य रमणलाल शहा, सुभाषराव जोशी, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. गणेश ठाकूर, दिलीप पाठक, अजित मुथा, अनील काटदरे उपस्थित होते.
मनसी माचवे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त श्रीकांत जोशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)