राज्यातील कष्टकरी, कामगारांना भरीव मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:36+5:302021-06-05T04:20:36+5:30
मिरज : कोरोना साथीमुळे राज्यात छोटे व्यावसायिक व कष्टकरी, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, नाभिक, चर्मकार, परीट व शेतकरी बांधवांचे ...
मिरज : कोरोना साथीमुळे राज्यात छोटे व्यावसायिक व कष्टकरी, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, नाभिक, चर्मकार, परीट व शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य शासनाने भरीव मदत देण्याची मागणी जनता दलाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
देशातील इतर राज्यांत कष्टकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली. मात्र महाराष्ट्र सरकारने केवळ पंधराशे रुपयांची तुटपुंजी मदत केली आहे. शेतकरी, घरगुती व बांधकाम कामगार, नाभिक, चर्मकार, परीट बांधव यांच्यासह छोटे व्यावसायिक व सर्व कष्टकरी घटकांना न्याय द्यावा. राज्यात पत्रकारांना फ्रंट लाइन दर्जा देऊन सर्वांना किमान १० हजार रुपये देण्याचे आदेश राज्यपाल महोदयांनी सरकारला द्यावेत. राज्यातील वृद्ध शेतकऱ्यांना दरमहा ५ हजार पेन्शन लागू करावी. सर्व खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा. वाढत्या इंधन दरवाढ व महागाई कमी करावी, या विविध मागण्यांबाबत जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे व शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.