आंदळकरांचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव करा; कुस्तीप्रेमींची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:13 AM2018-09-18T00:13:43+5:302018-09-18T00:13:47+5:30

Give glory to 'Padmabhushan' by Andalakar Wrestling spirit | आंदळकरांचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव करा; कुस्तीप्रेमींची भावना

आंदळकरांचा ‘पद्मभूषण’ देऊन गौरव करा; कुस्तीप्रेमींची भावना

Next

शिराळा/पुनवत : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्रातील मुकुटमणी हरपला आहे. शासनाने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, तसेच तरूण मल्लांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचे यथोचित स्मारक उभारावे, अशी मागणी सोमवारी पुनवत (ता. शिराळा) येथे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली.
हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे रविवारी सायंकाळी सात वाजता पुणे येथे निधन झाले. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर पुनवत या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदकेसरी शिवाजीराव पाचपुते, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, विष्णू जोशीलकर, काका पवार, आनंदराव धुमाळ, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
गणपतराव आंदळकर हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. गावातील निवडणुका बिनविरोध करण्याकामी त्यांनी मोठे योगदान दिले. गावातील तंट्यांचाही निपटारा त्यांच्या माध्यमातून झाला. सार्वजनिक कामातही त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. परिसरात अनेक नामांकित मल्ल त्यांनी घडवले. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक ग्रामस्थ सद्गदित झाले.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, कुस्ती क्षेत्राबरोबरच समाजकारण व राजकारणाचे आंदळकर यांच्या निधनामुळे न भरून येणारे नुकसान झाले आहे. तरूण मल्लांना त्यांनी कुस्ती क्षेत्राकडे वळवून कुस्तीचा लौकिक वाढविला. अनेक मल्ल घडविले.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख म्हणाले की, देशाच्या मल्लविद्येचे भूषण, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर आबा यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्राचे किंबहुना तरुण मल्लांचे फार मोठे नुकसान झाले आहे. जगभर त्यांनी आपले नाव कमाविले होते. कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक मानसन्मान मिळवून नवीन मल्लांना तयार करत त्यांना वाव मिळवून देण्याचे काम केले. ग्रामीण भागात कुस्तीचा प्रसार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारण व समाजकारणात सहभागी होत, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. एक मोठी व्यक्ती जाण्याने कुस्ती क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
हिंदकेसरी आंदळकर यांचे बालपणीचे मित्र दत्तात्रय भोळे यांनीही त्यांच्या आठवणींंना उजाळा दिला. ते म्हणाले, आंदळकर यांना लहानपणापासून कुस्तीचा नाद होता. शाळेपेक्षा ते कुस्ती व गावाकडच्या खेळातही रमले. शेतीकाम व गुरांचा सांभाळही त्यांनी काहीकाळ केला. कुस्तीतले कसब पाहून वडील पांडुरंग माने यांनी त्यांना कोल्हापूरला पाठवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
अपघातातून बचावले
आॅलिम्पिक वीर बंडा पाटील आठवण सांगताना म्हणाले की, १९६३ ला मी, मारुती माने व आंदळकर आबा आम्ही दिल्लीला कुस्तीसाठी निघालो होतो. त्यावेळी कºहाडमधून बसमधून जाणार होतो. मात्र बस चुकली. त्यामुळे आम्ही ट्रकने जाण्यास निघालो. मात्र सातारच्या पुढे ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. त्यावेळी आम्ही तिघेही वाचलो. त्यावेळी ट्रक चालकाने आमच्या पाया पडून, ‘तुमच्यात देवमाणूस आहे, त्यामुळे तुमच्याबरोबर आमचेही प्राण वाचले’, असे म्हटले. या अपघातातून बचावलो, त्यामुळेच कुस्ती क्षेत्रातील मुकुटातील एक हिरा मिळाला, असेच म्हणावे लागेल.

आंधळीत गाव बंद ठेवून श्रध्दांजली
पलूस : गणपतराव आंदळकर यांचे मूळ गाव असलेल्या आंधळी (ता. पलूस) गावातही सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रदांजली वाहण्यात आली. आंदळकर यांचे आजोबा जोतिराम माने हे शिराळा तालुक्यातील पुनवत येथे दत्तक गेले होते. तरीही त्यांचे मूळ गावाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. गणपतराव आंदळकर यांचा गावाला मोठा अभिमान होता. त्यांच्या सन्मानार्थ गावातील शाळेस गणपतराव आंदळकर यांचे नाव देण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. सोमवारी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. तसेच शाळांना सुटी देऊन ग्रामपंचायत व विविध संस्थांच्यावतीने गणपतराव आंदळकर यांना श्रदांजली वाहण्यात आली.

Web Title: Give glory to 'Padmabhushan' by Andalakar Wrestling spirit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.