मदत द्या, अन्यथा राज्यभरात भीक मांगो आंदोलन करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:50+5:302021-07-03T04:17:50+5:30
सांगली : टेलरिंग व्यावसायिकांना शासनाने मदत करावी, अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा टेलरिंग वेल्फेअर असोसिएशनने दिला. लॉकडाऊन ...
सांगली : टेलरिंग व्यावसायिकांना शासनाने मदत करावी, अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा टेलरिंग वेल्फेअर असोसिएशनने दिला. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असल्याने राज्यभरात लाखो व्यावसायिकांपुढे जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून टेलरिंग दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांचे व कारागिरांचे हाल सुरु असल्याचे पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी कबीर गवंडी, शशिकांत कोपार्डे, प्रवीण होनमोरे, गोरक्ष व्हनमाने, विकास मगदुम आदी उपस्थित होते. ते म्हणाले, लॉकडाऊन काळात विविध व्यावसायिकांना शासनाने मदत केली, टेलरिंग व्यावसायिकांकडे मात्र दुर्लक्ष केले. टेलरिंग व्यवसायावर अनेक महिला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. दुकाने बंद असल्याने त्यांची उपासमार सुरु आहे. चरितार्थासाठी त्यांना अन्य पर्याय देखील उपलब्ध नाही.
पाटील म्हणाले की, शासनाकडून कपड्यांसाठी वेळोवेळी निविदा काढल्या जातात. शाळांचे गणवेश, पोलिसांचे कपडे, एसटी कर्मचाऱ्यांचे कपडे आदी बाबतीत कामे दिली जातात. यामध्ये टेलरिंग व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे. गुणवत्तेबाबतीत आम्ही कोठेही कमी पडणार नाही. राज्यभरात २० ते २५ लाख टेलरिंग व्यावसायिक संकटात आहेत. त्यांच्या चरितार्थासाठी शासनाने मदत द्यावी. शासनाने लक्ष न दिल्यास राज्यभरातील टेलरिंग व्यावसायिक भीक मांगो आंदोलन करतील.