मतिमंदांना जगण्यास आत्मविश्वास द्या
By Admin | Published: September 22, 2016 11:02 PM2016-09-22T23:02:47+5:302016-09-23T00:43:28+5:30
सुगंधा सुकृतराज : मिरजेत इनरव्हील क्लबच्यावतीने समाजसेविकांचा सत्कार
मिरज : गतिमंद, मतिमंद विद्यार्थ्यांनाही रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवता येते. त्यांना जगण्याचा आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील जागतिक कीर्तीच्या समाजसेविका सुगंधा सुकृतराज यांनी येथे केले.
मिरजेत इनरव्हील क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमात सुगंधा सुकृतराज यांच्याहस्ते मतिमंद व गतिमंदांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आत्ममग्न विद्यार्थांना रोजगाराच्या संधी’ या विषयावर सुगंधा सुकृतराज यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, गतिमंद व मतिमंद मुले घरातील अडचण बनतात. पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना साधे शिक्षणही मिळू शकत नाही. मात्र अशा मुलांना संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही स्वावलंबी बनविता येते. रोजगाराच्या विशेष प्रशिक्षणामुळे अशी मुले संगणकावरही काम करू लागली आहेत. ‘डेल’सह मोठ्या संगणक कंपन्यांची कामे करून दहा ते वीस हजार वेतन ती मिळवित आहेत. अशा मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचशे संस्था संलग्न झाल्या आहेत. सांगलीतील आशादीप या संस्थेमार्फतही काम सुरू होणार आहे.
जागतिक पातळीवरील अशोका फेलोशीप व ‘हेलन केलर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सुगंधा सुकृतराज यांचा यावेळी सत्कार झाला.
याप्रसंगी चैतन्य माऊली फौंडेशनच्या संस्थापिका मालतीबाई जोशी, नवजीवन विकास मतिमंद मुलांच्या शाळेच्या संस्थापिका रेवती हातकणंगलेकर, अजिंक्य फौंडेशन मतिमंद मुलांच्या शाळेच्या संस्थापिका शैलजा गौंडाजे, आशादीप मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सतनाम चढ्ढा, उत्कर्ष गतिमंद मुलांच्या शाळेच्या संस्थापिका संगीता सोनवणे, भगिनी निवेदिता मुलींच्या वसतिगृहाच्या व्यवस्थापिका नसीम काझी, श्री ज्ञानमंदिर जानराववाडी शाळेच्या संस्थापिका संगीता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर होत्या. सुगंधा सुकृतराज यांनी २१७ संस्था भारतात स्थापन करून, अशा मुलांना आधार दिल्याचे क्लबच्या अध्यक्षा कविता मगदूम यांनी सांगितले.
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव सुरेखा कुरणे, डॉ. बी. टी. कुरणे, डॉ. पी. बी. मगदूम, रोटरीचे अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, सचिव अभय गुळवणी, अजित पाटील उपस्थित होते. अनघा भडभडे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)