लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा झालेल्या मुलांसाठी मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:31+5:302021-01-08T05:24:31+5:30
सांगली : लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा व्हावे लागलेल्या मुलांसाठी शिक्षण परिषदेने ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ हा अभिनव उपक्रम सुरू केला ...
सांगली : लॉकडाऊनमध्ये घरकोंबडा व्हावे लागलेल्या मुलांसाठी शिक्षण परिषदेने ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरू केलेला ‘गोष्टीचा शनिवारही’ लोकप्रिय ठरला आहे. युनिसेफ, प्रथम बुक स्टोरी व्हिवर आणि शैक्षणिक संशोधन परिषदेचा हा संयुक्त उपक्रम आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही ऑनलाईन शिक्षणदेखील सुरू आहे. कोरोनामुळे मुलांच्या अवांतर वाचनावर मर्यादा आल्या आहेत. ऑनलाईनच्या नावाखाली मुले मोबाईलमध्ये गुरफटण्याचा धोका आहे. यातून सुटकेसाठी गोष्टीचा शनिवार व मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका उपक्रम सुरू केल्याची माहिती डाएटचे प्रााचार्य रमेश होसकोटी यांनी सांगितले.
याअंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी गोष्टींच्या पीडीएफ फाईलीची लिंक व्हॉटस्ॲपवरुन पाठविली जाते. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमात ती उपलब्ध आहे. जिल्हा व तालुकास्तरावरुन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध व्हॉटस्ॲप ग्रुपवर शेअर केली जाते. शनिवार ते मंगळवार असे चार दिवस लिंकमधील गोष्ट विद्यार्थ्यांनी वाचून त्यातील उपक्रम सोडविणे अपेक्षित आहे. आपल्या विषय शिक्षकांकडून उपक्रम तपासून घेण्याच्याही सूचना आहेत.
या उपक्रमासाठी शिक्षण परिषदेने योग्य वाचन साहित्य आणि सुंदर चित्रे असणारी मनोरंजक पुस्तके निवडली आहेत. विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरुपात ती उपलब्ध आहेत. जिल्हास्तरावर डाएटच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी तालुकानिहाय समन्वयक नेमल्याची माहिती प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी दिली.
चौकट
०८०६८२६४४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या
वाचन संस्कृती वाढविण्यासाठीच्या ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ उपक्रमाअंतर्गत फोनवरून गोष्ट ऐकता येते. स्मार्ट व साध्या अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईल फोनचा वापर करता येतो. त्यासाठी ०८०६८२६४४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागतो. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत गोष्टी ऐकता येतात.
---------