नागपंचमीचा प्रस्ताव केंद्राला द्या
By admin | Published: April 8, 2017 12:03 AM2017-04-08T00:03:34+5:302017-04-08T00:03:34+5:30
सुधीर मुनगंटीवार : मुंबईत बैठक; कम्युनिटी रिझर्व्हबाबत विधी, वन विभागाला अभ्यासाची सूचना
शिराळा : कालबाह्य झालेल्या कायद्यात बदल करून, हजारो वर्षांची परंपरा असलेली शिराळा येथील नागपंचमी सुरू करण्यासाठी कम्युनिटी रिझर्व्हचा अभ्यास करून, प्रसंगी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून फक्त शिराळा गावासाठी नागपंचमी सुरू करण्यासाठी सरकार सकारात्मक असून, विधी न्याय विभाग व वन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. मुंबई येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
चार दिवसांपूर्वी आ. शिवाजीराव नाईक यांनी, नागपंचमीची परंपरा व भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून हजारो वर्षापासून सुरू असलेली जिवंत नागाची पूजा करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनात मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन पाठपुरावा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारी बैठक झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी, मी शिराळा येथील दौरा केला असून, लोकांच्या भावना समजून घेतल्या आहेत. ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदनही दिले होते. शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्यात येत असून, याला उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र येथील भाविकांच्या श्रद्धेचा, परंपरेचा विचार करून आणि कालबाह्य कायद्यात दुरुस्ती करून व कम्युनिटी रिझर्व्हचा अभ्यास करून त्यातून मार्ग काढला जाईल. प्रसंगी नागपंचमी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडेही प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना वन व विधी न्याय विभागाला दिल्या असून, याबाबतचा प्रस्ताव देऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आदीनी या तालुक्यात झालेल्या विविध सभांमध्ये नागपंचमीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार हा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या बैठकीस प्रधान सचिव जामदार, वन सचिव विकास खारगे, मुख्य वन संरक्षक एम. के. राव, कोल्हापूर विभागाचे वन संरक्षक अरविंद पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार दीपक शिंदे, उत्तम निकम, रणधीर नाईक, रणजित नाईक, अजित पाटील, संतोष गायकवाड, संतोष पाटील, संदीप पाटील, अॅड. नरेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. (वार्ताहर)
शिराळकरांचा तीव्र लढा...
नागपंचमीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर २०१४ पर्यंत अंतरिम आदेशानुसार जिवंत नागपूजा वन विभागाच्या देखरेखीखाली चालू होती. मात्र २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने अंतिम निकालात जिवंत नाग पकडणे व पूजेस बंदी घातली. यामुळे शहरामध्ये तसेच भाविकांच्यात तीव्र नाराजी पसरली. शिराळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. सहा महिन्यापूर्वी नगरपंचायतीची पहिली निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी सर्व नागरिक, नाग मंडळे कार्यकर्ते सर्वपक्षीय यांनी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठरविले. त्यामुळे निवडणूक स्थगित करावी लागली होती.