पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:41+5:302021-07-26T04:24:41+5:30
सांगली : महापुराने नुकसान झालेल्या शेतीला भरपाई म्हणून हेक्टरी एक लाखाची, तर घर पडलेल्यांना दोन लाखांची मदत करावी, अशी ...
सांगली : महापुराने नुकसान झालेल्या शेतीला भरपाई म्हणून हेक्टरी एक लाखाची, तर घर पडलेल्यांना दोन लाखांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात खराडे यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, शिराळा, मिरज या तालुक्यांमधील शंभर ते दीडशे गावांतील नदीकाठावरील ऊस, भात, सोयाबीन, मका, घेवडा, भाजीपाला आदीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी किमान एक लाखाची मदत करावी. त्याचबरोबर जिरवणीचा पाऊस असल्याने घराचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडझड झालेल्या लोकांना घर बांधणीसाठी दोन लाखांची मदत करावी. जेणेकरून पुन्हा त्याचा संसार सुरळीत होऊ शकेल.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता आहे. कारण चारा मिळणे मुश्किल झाले आहे. भाजीपाला उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो, वांगी, दोडका आदीसह सर्व नदीकाठावरील भाजीपाला पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, त्या शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक विमा नुकसानभरपाई द्यावी यासाठी पीक विमा कंपन्यांना सूचनावजा आदेश द्यावेत, अशी मागणीही केली आहे.