शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी द्या : ‘शिक्षक भारती’ची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:48 PM2018-10-17T18:48:06+5:302018-10-17T18:49:21+5:30
प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा करावी,
सांगली : प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीसह निवडश्रेणी त्वरित मिळाली पाहिजे, अशी मागणी शिक्षक भारतीतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. तसेच दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात केलेली रक्कम व्याजासह संबंधित शिक्षकांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणीही संघटनेतर्फे केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व कृष्णा पोळ यांनी दिली.
शरनाथे व पोळ म्हणाले की, दि. २३ आॅक्टोबर २०१७ नंतर बारा वर्षे व चोवीस वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतची मागणी केली आहे. दि. २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयातील विद्या प्राधिकरणाने नवीन प्रशिक्षण आयोजित केले नसल्याने संबंधित शिक्षकांच्या पदोन्नती थांबल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याचे हमीपत्र घेऊन पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मंजूर कराव, ही मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी, वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
शाळासिद्धीची वेबसाईट सुरू नसल्याने नवीन शाळांना पात्र असूनही माहिती भरता येत नाही. या प्रश्नावर अभिजित राऊत यांनी, शासनाकडूनच वेबसाईट बंद असून ती पुन्हा चालू करण्यात येणार आहे का, याबाबतची माहिती घेऊन तो प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची अंशदान कपात, सहाव्या वेतन आयोगाचे तीन हप्ते या शिक्षकांच्या भविष्य निर्वाह खात्यावर व्याजासह जमा करावेत, अशीही मागणी करण्यात आली होती.
या मागण्यांबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांनी सकारात्मक आश्वासने दिली आहेत, असेही त्यांनी सांगितलेयावेळी शिक्षक भारतीचे चंद्रशेखर क्षीरसागर, दिगंबर सावंत, बजरंग वीरभद्रे, संजय कवठेकर यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मिरज पंचायत समितीत : प्रश्न तसाच
मिरज तालुक्यातील शिक्षकांच्या पगारातून २०१५-१६ मध्ये जादा कपात झालेल्या फंडाच्या रकमा या शिक्षकांना व्याजासह मिळाव्यात, या प्रश्नावर जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ती रक्कमही मिरज पंचायत समितीकडे वर्ग केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला आहे. परंतु, मिरज पंचायत समितीतून तो प्रश्न सोडविला जात नाही, तोही सोडविण्याचे डॉ. गाडेकर यांनी आश्वासन दिल्याचे पोळ यांनी सांगितले.