स्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 02:25 PM2019-03-19T14:25:34+5:302019-03-19T14:28:08+5:30
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
सांगली : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत काय निर्णय होणार याकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील आघाडीच्या जागांच्या आदलाबदलीचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठीही कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मिता पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा कॉंग्रेसला द्यावी, असे सुचविले आहे.
पक्षाचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी यांच्यासह माजी सभापती संजय पाटील विश्वास तात्या पाटील, दत्ता हावले, विक्रम पाटील, कुलदीप मोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. स्मिता पाटील यांच्या उमेदवारीने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
सध्या कॉंग्रेसकडे अस्तित्वात असलेल्या इच्छुकांपेक्षा राष्ट्रवादीकडे अनेक सक्षम पर्याय आहेत. यामध्ये दिलीपतात्या पाटील, आण्णासाहेब डांगे, अरुणअण्णा लाड यांचा समावेश आहे.
उमेदवारीबरोबरच सांगलीतील कॉंग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांबद्दलही राष्ट्रवादीमार्फत तक्रार करण्यात येणार असल्याचे तांबोळी यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आघाडीतील मित्रपक्ष म्हणून एकाही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांशी कॉंग्रेस नेत्यांनी संवाद साधला नाही.
राष्ट्रवादीला दुर्लक्षित करून एकांगीपणाने कॉंग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्यामागे आम्ही फरफटत जाणार नाही. उमेदवारी किंवा रणनिती आखताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले जात नाही. आजपर्यंत कधीही सामुहिक बैठक घेतली नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी सल्लामसलत केलेली नाही. त्यांची जर एकला चलो ही भूमिका घेतली असेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही.
कॉंग्रेसमध्ये जो पोरखेळ सुरू आहे तो अत्यंत क्लेशदायक आहे. आज पतंगराव कदम, आर. आर. पाटील, मदन पाटील हे नेते असते तर आघाडीची एवढी वाईट अवस्था झाली नसती. कॉंग्रेसमुळे राष्ट्रवादी ची नाचक्की होत आहे.
दोन दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या मतदारसंघाची मागणी करणार आहोत. कॉंग्रेसकडे आम्ही आता पायघड्या घालणार नाही. त्यांच्यातील भांडणाचा फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.