दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी
By अशोक डोंबाळे | Published: February 3, 2024 06:40 PM2024-02-03T18:40:36+5:302024-02-03T18:41:03+5:30
शासनाकडून केवळ महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून केवळ एक महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा केली आहे. प्रत्येक्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत दुधाचा पुरवठा जास्त होतो. त्यामुळेच दुधाचे दर कमी होत आहेत. म्हणून शासनाने चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी शासनाकडे केली आहे.
स्वतंत्र भारत पक्षातर्फे शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, ५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी ११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक थंडीच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुधाचा पुरवठा जास्त असल्याने दुधाचे दर कमी होतात. मात्र, शासनाने एकाच महिन्यासाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. वास्तविक ते चार महिने शासनाने अनुदान दिले पाहिजे. तसेच अनुदान देतानाही काही त्रुटी आहेत.
शासन निर्णयामध्ये म्हटले की, दूध संघांनी किमान २७ रुपये प्रति लिटर दर दूध उत्पादकांना दिला पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. याचा दूध संघांनी सोयीचा अर्थ काढून पूर्वी दूध उत्पादकांना ३२ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. त्यामध्ये कपात करुन दूध संघांकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रुपये दराने बिले दिली जात आहेत. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. तरी पूर्वीचा जो दर २७ रुपयांपेक्षा जास्त देण्यात येत होता, त्याप्रमाणेच द्यावा, अशी मागणीही केली आहे. दूध संघचालक देत असलेल्या दरावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे, असेही सुनील फराटे म्हणाले.