गुंठ्याला दोन हजार भरपाई द्या

By admin | Published: February 17, 2016 11:23 PM2016-02-17T23:23:18+5:302016-02-18T21:45:58+5:30

चंदगडच्या शेतकऱ्यांची मागणी : हत्ती, गव्यांच्या उपद्रवप्रश्नी गडहिंग्लजला संयुक्त बैठक

Give two thousand compensation to Guntha | गुंठ्याला दोन हजार भरपाई द्या

गुंठ्याला दोन हजार भरपाई द्या

Next

गडहिंग्लज : हत्ती व गव्यांमुळे नुकसान होणाऱ्या शेतीला प्रतिगुंठा दोन हजार रुपयांप्रमाणे भरपाई मिळावी, अशी मागणी हत्ती उपद्रव क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांची संमती घेऊन भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, अशी ग्वाही डीएफओ रंगनाथ नाईकडे यांनी दिली.
हत्ती आणि गव्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आठवड्यापूर्वी पाटणे आणि चंदगड येथील वनखात्याच्या कार्यालयांना टाळे ठोकले होते. येथील सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी डीएफओंच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रांतकचेरीत ही बैठक झाली.
अ‍ॅड. संतोष मळवीकर म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून चंदगड तालुक्यात हत्तींचा उपद्रव सुरू आहे. मात्र, त्यावर वनखात्याला अद्याप उपाय सापडलेला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. आम्हाला तुटपुंजी भरपाई नको, आमची संपूर्ण जमीनच शासनाने ताब्यात घ्यावी. शेतीला गुंठ्याला दोन हजार, फळझाडांना प्रतिवृक्ष पाच हजार आणि कृषिपंप पाईपलाईनसह शेतीअवजारांची भरपाई बाजारभावाप्रमाणे द्यावी.
संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, तिलारीच्या जंगलात अजूनही आदी मानवाचे वास्तव्य आहे. दुर्मीळ वन्यप्राण्यांसह समृद्ध वनसंपदेचा आम्हालाही अभिमान आहे. मात्र, जंगली हत्ती व गव्यांच्या उपद्रवामुळे चंदगडकरांचे जगणे हैराण झाले आहे. त्यावर ठोस उपाययोजना व्हावी.
नाईकडे म्हणाले, आपण ‘चंदगड’मधील प्रश्नांच्या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळेच पिकांच्या भरपाईत भरीव वाढ झाली आहे. हत्ती हलविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे.
चर्चेत जि. प. सदस्य तात्यासाहेब देसाई, कोळिंद्रेचे सरपंच रूपेश अनगुडे, गुडवळेचे सरपंच संतोष गावडे, विवेक पाटील, आप्पाजी गावडे, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक यांनीही चर्चेत भाग घेतला.
बैठकीस ‘आजरा’चे उपाध्यक्ष सुनील शिंत्रे, सभापती मीनाताई पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली व शैलजा पाटील, राजन देसाई, एस. बी. तडवळेकर व सी. जी. गुजर, पोलीस निरीक्षक महावीर सकळे, आदींसह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)



‘डीएफओ’वर हल्लाबोल
आठवड्यापूर्वीच्या आंदोलनाच्यावेळी हत्ती उपद्रवग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा अन्य विषय महत्त्वाचे आहेत. आंदोलक ांवर गुन्हे दाखल करा, अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीतच ‘डीएफओं’चा निषेध केला. हत्ती थेट घरात घुसत असल्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे. हत्तींना हलवा, नाहीतर आम्हाला बंदुका हातात घ्याव्या लागतील, असा इशारा अ‍ॅड. मळवीकर यांनी दिला.


सारेच ‘पक्ष’ आले धावून !
जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे गेल्या १२ वर्षांपासून चंदगडचा शेतकरी संतप्त आहे. या प्रश्नावर अनेकदा आंदोलने झाली. केवळ चर्चा-बैठकांपलीकडे कोणत्याही राजकीय पक्षाचा या प्रश्नात ठळक सहभाग दिसला नाही. मात्र, ‘एव्हीएच’च्या श्रेयवादाचे राजकारण रंगत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादीसह जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीस लावलेल्या हजेरीची चर्चा झाली.

Web Title: Give two thousand compensation to Guntha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.