‘वसंतदादा’ उसाला दोन हजारावर दर देणार
By Admin | Published: October 14, 2015 11:21 PM2015-10-14T23:21:10+5:302015-10-15T00:34:35+5:30
विशाल पाटील : कामगारांना बोनस देणार; साखर कारखान्याच्या गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ
सांगली : वसंतदादा साखर कारखाना यावर्षी उच्चांकी गाळप करणार असून, उसाला प्रतिटन दोन हजारापेक्षा जास्त पहिली उचल देण्यात येईल. एफआरपीप्र्रमाणेच बिले दिली जातील, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केले. यावर्षी कामगारांनी कमी वेळेत हंगाम सुरु केला आहे, म्हणून कामगारांनाही बोनस देऊन खूश करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वसंतदादा कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गिरधर पाटील उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले की, कारखाना आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. यावर्षी सर्वात प्रथम गळीत हंगाम सुरू करून सर्व ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्याची पूर्वीची थकित रक्कम दिली आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात उसाची नोंद केली आहे. दोन हजार रूपयांपेक्षा जास्त पहिली उचल देण्यात येईल. एफआरपीची रक्कमही जमा करण्यात येईल. कामगारांना दिवाळीत बोनस देऊन खूश करण्यात येईल.
शिवाजीराव गिरधर पाटील म्हणाले की, वसंतदादांनी राज्यात साखर कारखानदारीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता निर्माण केली. राजकारण करतानाही स्वाभिमान सोडला नव्हता. कारखाना विशाल पाटील सध्या चांगल्या पध्दतीने चालवत आहेत. सी. बी. पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे यांनीही भाषण केले. यावेळी उपाध्यक्ष बाळगोंडा पाटील, कार्यकारी संचालक के. बी. घुटे-पाटील, संचालक आदिनाथ मगदूम, निवास पाटील, सचिन डांगे, संदेश आडमुठे, सुनील आवटी, दिलीप पवार, राजेश एडके, कामगार संघटनेचे नेते प्रदीप शिंदे, श्रीकांत देसाई, प्रकाश पाटील उपस्थित होते. उपाध्यक्ष डी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शामराव पाटील यांनी आभार मानले.
दिलीपतात्यांच्या विशाल यांना कानपिचक्या
विशाल पाटील यांनी २०१३-१४ यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये गडबड करून प्रतिटन २६०० रुपये दर जाहीर केला. त्या चुकीचे फळ आजही ते भोगत आहेत. गेल्यावर्षी सर्व कारखानदारांनी एकत्रित बैठक घेऊन साखर उद्योगासमोरील अडचणींवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरू केली होती, तोपर्यंत विशाल पाटील आणि वैभव नायकवडी यांनी गळीत हंगाम सुरू केला. त्यांचा त्यांना फटका बसला आहे. तरीही त्यांनी धाडसाने यावर्षी पुन्हा सर्वात आधी गळीत हंगाम सुरू केला आहे. पण, अतिघाई चांगली नसते, असा कानमंत्रही दिलीपतात्या पाटील यांनी विशाल पाटील यांना दिला.
गुजरातच्या कारखान्याची चूक महागात पडली
गुजरात येथील साखर कारखाना खरेदीसाठी जयंत पाटील आणि प्रकाशबापू पाटील यांच्यात स्पर्धा लागली होती. यावेळी तो कारखाना चढ्या दराने प्रकाशबापूंनी खरेदी केला. पण, पुढे त्याचा प्रकाशबापूंनी काहीच उपयोग केला नाही. वसंतदादा कारखान्यावर मात्र त्याचा कोट्यवधीचा बोजा पडला. अशा व्यवहारापासून सावध राहण्याचा सल्ला दिलीपतात्यांनी यावेळी विशाल पाटील यांना दिला.