राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे पाणी द्या, सांगलीतील भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 12:58 PM2022-11-11T12:58:07+5:302022-11-11T12:58:37+5:30

नदीकाठच्या परिसरातील गावांना याचा फायदा होणार

Give water from Jiye Katapur or Urmodi in Rajewadi lake in Sangli district | राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे पाणी द्या, सांगलीतील भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

राजेवाडी तलावात जीये कटापूर किंवा उरमोडीचे पाणी द्या, सांगलीतील भाजप नेत्यांची फडणवीसांकडे मागणी

Next

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावामध्ये जीये कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजेवाडी तलावामध्ये जीए कटापूर किंवा उरमोडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत संबंधितांना आदेश देण्याबाबत मागणी केली आहे.

कोरेगाव व माण-खटावच्या मागणीनंतर शिल्लक राहिलेले ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात सोडून दरवर्षी तलाव भरण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. याबाबत लवकरच वरिष्ठ स्तरावर बैठक होणार असून, यामुळे माणगंगा नदी बारमाही प्रवाहित होण्यास मदत मिळणार आहे. याचा फायदा नदीकाठच्या परिसरातील गावांना होणार आहे.

यावेळी हर्षवर्धन देशमुख, जयवंतराव सरगर, अनिल पाटील, यल्लाप्पा पवार, प्रणव गुरव, हरिशेठ गायकवाड, अनिल सूर्यवंशी उपस्थित होते.

एमआयडीसीसाठी लवकरच बैठका

आमदार पडळकर म्हणाले की, पाणी दाखल्यासाठी रखडलेले काम आता मार्गी लागले असून, कामथ किंवा जांभुळणी तलावातून एमआयडीसीच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. शेतकऱ्यांनी जमीन देऊ केली असून, ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राचा विषयही मार्गी लागला आहे. कामथ येथे एमआयडीसीसाठी ३५० एकर शेतजमिनीचा प्रश्न मार्गी लागत आहे. एमआयडीसीमुळे जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तीन किंवा साडेपाच पट भरपाई मिळणार आहे. तसेच एमआयडीसीत त्यांना बिगर शेतीचे प्लॉटही मिळतात. याबाबत लवकरच मुंबईत बैठक होणार आहे.

वन पर्यटन क्षेत्र विकसित करणार

आटपाडी येथे तलाव परिसरात फुलपाखरांची बाग करण्याचा नवीन प्रस्ताव सुचविण्यात आला आहे. तलावात बोटिंग सुविधा करण्याचा, तसेच त्या परिसरात वॉकिंग ट्रॅक, बगीचा यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे, अशी माहिती आमदार पडळकर यांनी दिली.

Web Title: Give water from Jiye Katapur or Urmodi in Rajewadi lake in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.