कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:17 PM2019-05-29T23:17:02+5:302019-05-29T23:17:45+5:30
दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सांगली : दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पाण्यापासूनची वीज निर्मिती बंद करून त्याऐवजी पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील विजेचा वापर वाढविण्याची विनंतीही त्यांनी केली.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही त्यांनी, कोयनेतील पाण्याचा विजेसाठी होणारा वापर थांबविण्याची मागणी केली.
अरुण लाड म्हणाले की, कोयना धरणामुळे पश्चिम महाराष्ट्राचा जास्तीत जास्त भाग ओलिताखाली आला आहे. धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे. पैकी वीज निर्मितीसाठी धरणातील ६७.५० टीएमसी पाणी आरक्षित आहे. त्यापैकी ६३.१६ टीएमसी पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी झाला आहे. सध्या वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवलेल्यापैकी ४.३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याचा वापर वीज निर्मितीसाठी न करता, ते पाणी शेती आणि पिण्यासाठी देण्याची गरज आहे. मान्सूनचा पाऊस कधी येणार, हे निश्चित नसून, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची जिल्ह्यात आणखी टंचाई निर्माण होणार आहे. हे लक्षात घेऊनच प्रशासनाने पाण्यापासून वीज निर्मितीपेक्षा पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील वीज वापराला अधिक पसंती देण्याची गरज आहे. सौरऊर्जा निर्मितीलाही प्रोत्साहन दिल्यास भविष्यातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल. मेअखेरपर्यंत एकही वळीव पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. हे लक्षात घेऊनच शेतीसाठी कोयनेतून जादा पाणी सोडण्याची गरज आहे. निवेदन देताना इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, अशोक पवार, विश्वास पवार उपस्थित होते.
दुष्काळाचे संकट
जिल्ह्यातील दहापैकी पाच तालुके भीषण दुष्काळाच्या संकटात आहेत. या तालुक्यांत पिण्याचे पाणीही वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तेथे वेळेवर आणि स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊनच कोयनेतील वीज निर्मितीसाठीचे आरक्षित पाणी शेती आणि पिण्यासाठी वळविण्याच्यादृष्टीने गांभीर्याने विचार करावा, असेही लाड यांनी सांगितले.