महिलांना ST सवलतीच्या निर्णयाचा फेरविचार करा; लाखो वाहतूकदारांचा रोजगार हिरावला, रयत क्रांतीचे निवेदन
By संतोष भिसे | Published: March 26, 2023 07:05 PM2023-03-26T19:05:48+5:302023-03-26T19:06:21+5:30
एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याने खासगी प्रवासी वाहतूक संकटात आली आहे
सांगली: एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याने खासगी प्रवासी वाहतूक संकटात आली आहे. राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी रयत क्रांती वाहतूक संघटनेने केली आहे.
संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, राज्यात सात लाखांहून अधिक खासगी वाहतूकदार व्यवसाय करतात. महिलांना एसटीमध्ये सवलत दिल्याने खासगी वाहनांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. गाडीमालक व चालकांचा रोजगार थंडावला आहे. दिवसभरात एखादी फेरी होत आहे. व्यवसायासाठी लाखो रुपयांची कर्जे काढली आहेत, ती कशी फेडायची याची चिंता लागली आहे.
काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने सवलतीच्या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा, खासगी वाहनांना परिवहन महामंडळाचे नियम लागू करून भरपाई अदा करावी. कर्जमाफी द्यावी, टॅक्सी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यावर आमचा प्रतिनिधी घ्यावा. व्यावसायिक व चालकांना दरमहा २० हजार रुपये मानधन द्यावे, शासकीय सेवेत घ्यावे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश माने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले यांच्या सह्या आहेत.