Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:42 AM2023-01-02T11:42:36+5:302023-01-02T11:49:19+5:30
पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले
अशोक पाटील
इस्लामपूर : विविध पक्षांशी घरोबा केल्यानेच शेतकरी चळवळ मागे पडली. आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
शेट्टी म्हणाले, सत्तेसाठी आपण राजकारण करणार नाही. चळवळीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बळ देण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. काही ग्रामपंचायतींमध्ये स्वाभिमानी संघटनेचे सरपंच आणि सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बळ आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका संघटनेची असणार आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विशेषत: सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणात मतांच्या घोडेबाजाराचा ट्रेंड आला आहे. यावर शेट्टी म्हणाले, आपण अशा ट्रेंडच्या पाठीमागे लागणार नाही. जन्मत: आमचे रक्त चळवळीचे आहे. चळवळीतून आपण मोठे झालो आहोत. आगामी काळात राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार आहे. यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांना बळ देणार आहोत. प्रत्येक भागातील स्वाभिमानीचा कार्यकर्ता सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका बजावून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. त्यामुळे आता राजकारणापेक्षा चळवळच आम्हांला महत्त्वाची वाटत आहे.
ते म्हणाले, आगामी काळात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पक्षीय उमेदवारांची संख्या कितीही असो, आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतूनच निवडणूक लढविणार आहोत. कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही.
एक व्होट एक नोट
पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले. परंतु आगामी लोकसभेला मात्र एक व्होट एक नोट हा स्वाभिमानीचा नारा घेऊनच निवडणुकीत उतरणार. मतदार, शेतकरी राजा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील, असाही विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.