मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे
By अविनाश कोळी | Published: September 18, 2022 07:13 PM2022-09-18T19:13:32+5:302022-09-18T19:16:18+5:30
सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली.
सांगली - मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असतानाही ही जागा आम्ही युतीच्या वाटाघाटीत भाजपाला सोडणे ही आमची चूक होती, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले की, सांगलीचे आणि माझे नाते जवळचे आहे. सांगली जिल्हा हा हिंदुत्ववादी विचारधारेचा आहे. युती करताना मिरज मतदारसंघ भाजपाला सोडून दिल्याची चूक सुधारून मिरज, खानापूरसह अन्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू. सांगली जिल्ह्याला ताकद देऊन शिवसेना भक्कमपणे उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी एकसंधपणे काम केल्यास यश निश्चितपणे मिळेल. जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी आतापासून तयारीला लागावे. पक्षाला अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या शिवसैनिकांना योग्य संधी दिली जाईल. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, खासदार विनायक राऊत, सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, सुजाता इंगळे, बजरंग पाटील, रणजीत जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भगवा फडविण्याचा निर्धार
शिवसेना, युवासेना, महिला आघाडीसह सर्व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासह संघटनात्मक बांधणी मजबूत करून सांगलीमध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.