खासगी शाळांमुळे झेडपीच्या शाळांवर गंडांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:28 PM2019-05-04T15:28:47+5:302019-05-04T15:30:07+5:30
वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन होण्याची शक्यता आहे.
सांगली : वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या दोन हजाराहून अधिक होती. पण, दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांची संख्या कमी होत असून, सध्या एक हजार ६९१ शाळा आहेत. या शाळांमध्येही यंदा शंभरापर्यंत घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ९६ शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दहाच्या आत आहे.
कमी गुणवत्तेमुळेच या शाळांची पटसंख्या घटल्याचा निष्कर्ष काढून, त्या बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या शाळांच्या तीन किलोमीटर परिसरातील अन्य शाळांत यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याने, शिक्षण हक्काचा भंग होणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
नजीकच्या भागात जिल्हा परिषदेची शाळा उपलब्ध नसल्यास अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांचे नियोजन होत नसल्यास त्यांच्या सेवा शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे उपयोगात आणाव्यात, असे याबाबतच्या निर्णयात म्हटले आहे.
याचबरोबर ११ ते २० पटाच्या शाळांची संख्याही २५९ असल्यामुळे त्याही अडचणीतच आहेत. या शाळांमधील पटसंख्याही टिकून राहील, याची खात्री नाही. २१ ते ३० पटसंख्येच्या ३३७ शाळा असून, ३१ ते ६० विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांची संख्या ३४७ आहे.
एक ते ६० विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा एक हजार ३९ आहेत. एकूण शाळांच्या ६० टक्केहून अधिक शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या जेमतेमच आहे. १२१ पेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळांची संख्या केवळ ३७७ आहे. पटसंख्येवरुन जिल्हा परिषद शाळांसमोरील संकट किती गडद झाले आहे, ते स्पष्ट होत आहे.
खासगी इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढू लागल्यामुळेच अनुदानातील शाळा अडचणीत आहेत. या शाळा भविष्यात टिकविण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.