जागतिकीकरणामुळे समाजातील आर्थिक दरी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:25+5:302021-01-17T04:23:25+5:30
सांगलीत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. ...
सांगलीत डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. एच.एम. कदम, डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डी.जी. कणसे, प्रा. संजय ठिगळे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिकीकरणामुळे समाजातील आर्थिक दरी वाढत चालली आहे. त्याविषयी समाजात जनजागृतीची गरज असल्याचे प्रतिपादन भारती अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. सांगलीवाडी येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रा. संजय ठिगळे यांच्या ‘अर्थभान’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील होते. विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच.एम. कदम, ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन आदी उपस्थित होते. ‘साहित्यविश्व’ या वेब पोर्टलचे अनावरण डॉ. साळुंखे यांच्या हस्ते या वेळी झाले.
डॉ. साळुंखे म्हणाले, वाढत्या आर्थिक दरीचे पुरेपूर विश्लेषण आणि जनजागृतीचे काम ‘अर्थभान’ पुस्तकाने केले आहे. या विषयावर तुलनेने कमी लेखन होते, ते वाढण्याची गरज आहे. शाश्वत विकासाचे अर्थशास्त्र देशाला समृद्ध करते. त्याला चालना देणारे अभ्यासपूर्ण लिखाण व्हायला हवे.
डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीत कुटुंबांचे अर्थशास्त्र बिघडत चालले आहे. एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत आहे. सुदृढ समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. आर्थिक विषयावर लेखन करणाऱ्याला आर्थिक व सामाजिक भान आणि समाजहिताचा दृष्टिकोनही असावा लागतो.
प्रा. महाजन म्हणाले, अर्थशास्त्र अधिक सोपे करण्याच्या प्रयत्नात त्यातील आत्मा हरपण्याची भीती असते. अर्थविषयक लेखकाने याचे भान ठेवायला हवे.
कार्यक्रमाला दादासाहेब ठिगळे, सुशीला ठिगळे, भाग्यश्री कासोटे- पाटील आदी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य डी.जी. कणसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले. आभार प्रा. तानाजी सावंत यांनी मानले.
--------------------