साखरसम्राटांना सदाभाऊंची चपराक
By admin | Published: March 21, 2017 11:43 PM2017-03-21T23:43:35+5:302017-03-21T23:43:35+5:30
वाघवाडी कृषी महाविद्यालयास नाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सन्मान
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील राजारामबापू पाटील यांनी निर्माण केलेल्या सर्वच सहकारी संस्थांना त्यांच्या राजकीय वारसदारांनी बापूंचे नाव दिले आहे. याउलट सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनी वाघवाडी येथे होणाऱ्या कृषी महाविद्यालयाला क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव देऊन साखरसम्राटांना चपराक दिली आहे.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांच्या जिवावर राजकीय बस्तान बसवले आहे. त्यांनी साखर उद्योगाच्या साहाय्याने शैक्षणिक, वित्तीय आणि सहकारी संस्था निर्माण केल्या. मात्र या संस्थांना घरातील नेत्यांचेच नाव देण्याचा फंडा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अलीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सर्वच सहकारी साखर कारखान्यांची नावे बदलण्याचा फंडा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला आहे. कारखान्याची सत्ता बदलली की कारखान्याचे नाव बदलण्याचे राजकारणही खेळले जात आहे. वाळवा तालुक्यातील राजारामबापू उद्योग समूहात हेच दिसते. राजारामबापू पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत वाळवा सहकारी साखर कारखाना, वाळवा सहकारी बँक, वाळवा सहकारी दूध संघाची स्थापना केली होती.
कालांतराने सर्वच संस्थांचा विस्तार वाढत गेला. राजारामबापूंच्या पश्चात त्यांचे पुत्र आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक संस्थेला राजारामबापूंचे नाव देण्याचा सपाटा लावला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतले तरीही, सत्तेच्या जोरावर त्यांनी सर्व विरोध धुडकावून लावत हवे तेच केले.
इस्लामपूर नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या इमारती, प्रकल्प, संकुलांना राजारामबापूंचेच नाव देण्यात आले आहे.
नाट्यगृह नामकरणावेळी तर गदारोळ झाला. शिवसेनेने एका रात्रीत डिजिटल फलक लावून नाट्यगृहाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले होते. परंतु सत्ताधाऱ्यांनी अखेर नाट्यगृहाला राजारामबापूंचेच नाव दिले. पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामानंतर येथील वसंतदादा सभागृहाचे नाव बदलून राजारामबापूंचे नाव देण्यात आले. याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परंतु येथे जयंत पाटील यांचाच विजय झाला. शासनाकडूनही राजारामबापूंचे नाव ठेवण्याचा निर्णय कायम झाला.
क्रांतिसिंहांच्या विचारावर श्रध्दा
आता राज्यातील साखरसम्राटांच्या मक्तेदारीला विरोध आणि जयंत पाटील यांना चपराक देण्यासाठीच वाघवाडी येथे होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालयाला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नाव दिले आहे. सदाभाऊ यांची क्रांतिसिंहांच्या विचारांवर श्रद्धा आहे. या श्रद्धेची जपणूकच त्यांनी यातून केली आहे, अशी चर्चा सध्या वाळवा तालुक्यामध्ये सुरु झाली आहे.