सुवर्णनगरीत नाथाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:45 PM2019-04-29T23:45:39+5:302019-04-29T23:45:44+5:30
विटा : ‘श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं... श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष, गुलालाची प्रचंड उधळण आणि शोभेच्या दारूच्या नयनरम्य आतषबाजीत ...
विटा : ‘श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं... श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष, गुलालाची प्रचंड उधळण आणि शोभेच्या दारूच्या नयनरम्य आतषबाजीत विट्याचे ग्रामदैवत श्री नाथबाबांची यात्रा रविवारी शांततेत, भक्तिपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
रविवारी रात्री हत्ती, घोडे, मोरांगी वाद्यासह ‘श्रीं’च्या पालखीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. अत्यंत शांततामय वातावरणात श्री नाथबाबांच्या पालखीचा सोहळा पार पडला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
विटा शहराचे ग्रामदैवत श्री नाथ देवाच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवार, दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजता अंमलीच्या गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी म्हणजे शनिवारी मध्यरात्री १२ वाजता श्रींचा जन्मकाळ झाला. रविवारी सायंकाळी ९ वाजता श्रीं चा पोशाख, श्रींचा छबिना व पालखीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
रविवारी काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीच्या सोहळ्यात विटा व परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. पहाटे तीन वाजेपर्यंत देवांच्या पालख्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विट्यात नाथाष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी विट्याचे ग्रामदैवत श्री नाथाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.