ऑन ड्युटी गोवा सहल नडली, अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीच; सांगली जिल्हा बँकेतील प्रकार
By अविनाश कोळी | Published: June 29, 2023 02:29 PM2023-06-29T14:29:30+5:302023-06-29T14:29:59+5:30
सोशल मीडियावरील फोटोमुळे कारनामा उजेडात
सांगली : वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुट्या रद्द केल्यानंतर जत तालुक्यातील जिल्हा बँकेच्या उत्साही सहा अधिकाऱ्यांनी ऑनड्युटी गोवा पर्यटनाचा आनंद लुटला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. हा प्रकार समजताच बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सर्वांची जत तालुक्यातून शिराळ्याला बदली केली.
एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत जूनपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची सूचना सीईओ शिवाजीराव वाघ यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यासाठी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुटी दिवशीही या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कर्ज वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण जिल्हाभर ही मोहीम सुरू आहे.
प्रशासनाच्या आदेशानंतरही जत तालुक्यातील आठ अधिकाऱ्यांनी मागील शनिवारी, रविवारी बॅंकेला असलेल्या सुटीला लागून एक रजा टाकली आणि गोव्यात मौजमजा करण्यासाठी धावले. इकडे शाखेतील अन्य कर्मचारी मात्र सुटीदिवशीही कामावर येत वसुली करीत होते. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी या आठ कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी शिराळ्या तालुक्यात बदल्या केल्या.
सोशल मीडियावरील फोटोमुळे कारनामा उजेडात
ऑनड्युटी सहलीचा आनंद लुटताना त्यांनी गोव्यात गेलेल्या मौजमस्तीचा फोटो बॅंक कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळेच त्यांचा कारनामा समोर आला आणि कारवाई झाली.