प्रत्येक घटकाचे समाधान हेच उद्दिष्ट - अभिजित चौधरी- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:56 PM2019-03-02T23:56:09+5:302019-03-02T23:56:39+5:30
सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या
शरद जाधव।
सांगलीतजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रथम प्राधान्य असेल. काम करायला खूप संधी आहे.
प्रश्न : जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्याचे एक ‘व्हिजन’ ठरलेले असते. त्यानुसार आता सांगली जिल्ह्याच्याबाबतीत आपले व्हिजन काय असणार आहे?
उत्तर : सूत्रे हाती घेतल्यापासूनच जिल्ह्यातील प्रश्नांची माहिती करून घेत आहे. तसेच समस्यांची माहिती घेत त्याच्या निवारणासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याच्या कमकुवत बाबींवर विशेष लक्ष देऊन त्यावर उपाययोजना करणार आहे. सध्यातरी निवडणुका शांततेत होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले आहे. टंचाई निवारण व निवडणूक हेच सध्याचे महत्त्वाचे प्राधान्यक्रमाने कामकाज असणार आहे.
प्रश्न : फेबु्रवारी महिन्यातच जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अजूनही उन्हाळ्याची तीव्रता वाढेल तशी टंचाई परिस्थिती वाढणार आहे, याचे प्रशासनातर्फे कसे नियोजन करण्यात आले आहे?
उत्तर : दुष्काळ निवारणासाठी व त्यावरील शाश्वत उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न असणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही पाणीयोजनांमुळे टंचाई परिस्थिती आटोक्यात आहे. तरीही पाझर तलाव भरून घेणे, जिथे मागणी असेल त्याठिकाणी तात्काळ टॅँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतूून टंचाई निवारणाचे नियोजन आहे.
प्रश्न : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम कसा असणार आहे?
उत्तर : अनेक नागरिक प्रत्यक्षपणे आपल्या अडचणी येऊन मांडत असतात. तर अनेकांना कुठे समस्या मांडायची याबाबत माहिती नसते. त्यासाठीच ‘टास्क रिमायंडर’ही प्रणाली जिल्ह्यात कार्यान्वित करणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक असतील. नागरिकांनी समस्या मांडताच त्या विभागाच्या अधिकाºयांना संदेश जाईल. विशिष्ट कालमर्यादेतच नागरिकांची अडचण सोडविणे यात महत्त्वाचे आहे.
महापालिकेसाठी आयुक्त सक्षम, तरीही...
महापालिकेच्या कामकाजाबाबत सर्वत्रच चर्चा होत असते. महापालिकेचे कामकाज करण्यासाठी आयुक्त कार्यरत असतात. त्यांच्या नियोजनानुसार महापालिका क्षेत्रात कामकाज झाले पाहिजे. त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी आयुक्तांनी आपले कामकाज केले पाहिजे. तक्रारी येणार नाही असे कामकाज सांगलीत होईल, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शाश्वत प्रयत्न केले जातील - जिल्हाधिकारी अभिजित चौधरी