शिराळे खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी, रेडी ठार
By श्रीनिवास नागे | Published: May 9, 2023 03:44 PM2023-05-09T15:44:31+5:302023-05-09T15:48:20+5:30
बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पुनवत : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथे नाईकदरा परिसरात असलेल्या सुवर्णा आनंदा मोरे यांच्या जनावरांच्या शेडवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक रेडी व शेळी ठार झाली.
शिराळे खुर्द गावच्या पूर्वेला वारणा कालव्याच्या परिसरात नाईकदरा शेत आहे. तेथे सुवर्णा आनंद मोरे यांचे जनावरांचे शेड आहे. या शेडला अर्धवट भिंती असून भिंतीच्या वर मोकळी जागा आहे. या भिंतीवरून उडी मारून बिबट्याने शेडमध्ये प्रवेश केला. यावेळी रेडी व एका शेळीचा बिबट्याने फरशा पाडला. या हल्ल्यात शेडमध्ये असलेली अन्य एक रेडी बचावली.
घटनास्थळी वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, दत्तात्रय आंदळकर, उपसरपंच संदीप पाटील, प्रशांत पाटील, कोतवाल बाबूराव काळे, अमर पाटील आदींनी भेट देऊन पंचनामा केला.
नुकसान भरपाई द्यावी
बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने योग्य ती नुकसानभरपाई देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे.