पुनवत येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:24 AM2021-02-12T04:24:33+5:302021-02-12T04:24:33+5:30
पुनवत : पुनवत, ता. शिराळा येथील खोकडबीळ नावाच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर बुधवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार ...
पुनवत : पुनवत, ता. शिराळा येथील खोकडबीळ नावाच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर बुधवारी मध्यरात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. यामध्ये मेंढपाळ शिवाजी अनुसे (मूळ गाव गायकवाडी, ता. कागल) यांचे सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले आहे.
रिळे येथील हल्ल्यानंतर पुनवत भागातही हल्ला झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
पुनवत - खवरेवाडीदरम्यान कालव्याच्या पूर्वेला खोकडबिळ नावाचे शेत आहे. या शेतात कागल तालुक्यातून आलेल्या मेंढपाळाच्या मेंढ्या बसावयास जागा आहे. या कळपावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक शेळी ठार झाली. मेंढ्यांच्या ओरडण्याने मेंढपाळ जागे होताच बिबट्याने पळ काढला.
घटनास्थळी वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, पोलीसपाटील बाबासाहेब वरेकर, मारुती पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. मेंढपाळाच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करणार असल्याचे वनविभागाने यावेळी सांगितले.
यावेळी वनरक्षक प्रकाश पाटील यांनी मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचा सल्ला दिला. रिळेपाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी पुनवत येथे बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.