नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांचे देव पाण्यात
By Admin | Published: October 25, 2016 11:48 PM2016-10-25T23:48:01+5:302016-10-26T00:10:50+5:30
कवठेमहांकाळ नगरपंचायत : अनुसूचित महिलेसाठी राखीव, राजकीय कें द्रात गटा-तटाचा संघर्ष
अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ --पहिल्या नगरपंचायतीचे धुमशान सुरू झाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. सतरा प्रभागांतून सतरा नगरसेवक या निवडणुकीत निवडून जाणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांनी गर्दी केली आहे. हे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. पहिला नगराध्यक्ष कोण होणार, निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याची जोरदार चर्चा तालुक्यासह कवठेमहांकाळ शहरात सुरू आहे.
कवठेमहांकाळ शहर हे तालुक्याचे राजकीय केंद्र आहे. शहरात सध्या पक्षीय राजकारणाला बगल देत गटा-तटाचे राजकारण जोमात सुरू असून, नगरपंचायतीच्या निवडणुकीतही गटा-तटातच जोरदार संघर्ष होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. शहरात आबा गट, विजयराव सगरे गट, काका गट आणि अजितराव घोरपडे गट असे गट आहेत. आबा गटाचे शहरातील नेतृत्व गजानन कोठावळे सांभाळतात. त्यामुळे ही नगरपंचायतीची निवडणूक संघर्षपूर्ण होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाची युती कोणाशी होणार, यावर नगरपंचायतीचा निकाल अवलंबून असणार आहे.
सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, आबा गट आणि घोरपडे गटाचे सलोख्याचे राजकीय संबंध आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी कोण कुणाशी युती करणार, यावरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. खा संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील, अजितराव घोरपडे यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी ही निवडणूक दिशा देणारी ठरणार असल्याने, हे तिघेही या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावणार, हे स्पष्ट आहे. गतवेळच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सगरे, घोरपडे, काका हे गट एकत्रित आबा गटाच्या विरोधात लढले होते. त्यावेळी कोठावळे यांनी एकाकी जोरदार टक्कर दिली होती. यामध्ये ग्रामपंचायतीवर सगरे, घोरपडे, काका गटाची सत्ता आली होती. सहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ सोसायटीची निवडणूक झाली. यामध्ये कोठावळे, घोरपडे, काका आणि शिवसेना यांची युती होती. त्यांनी सगरे गटाला पराभवाचा धक्का दिला होता.
माजी मंत्री जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांचे या निवडणुकीवर विशेष लक्ष असल्याने, त्यांची भूमिका व निर्णय या निवडणुकीत महत्त्वाचा असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे, तर शिवसेनाही दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा लढविण्याचा तयारीत आहे. आरपीआय, बसप हे पक्षही तयारी करत आहेत.
ग्रामपंचायत १९५४ मध्ये स्थापन झाली होती. ती १६ मार्च २0१६ ला संपुष्टात येऊन नगरपंचायत अस्तित्वात आली. या नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग असून साडेपंधरा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच या निवडणुकीत युवावर्ग जोमात असणार आहे. एकूणच अद्याप राजकीय समीकरणे स्पष्ट नाहीत. येत्या आठवड्याभरात ही समीकरणे स्पष्ट होणार आहेत. सध्या तरी वरिष्ठ पातळीवर आघाड्या करण्यासाठी बैठका सुरु आहेत.
नवी समीकरणे : चुरस निश्चित
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची राजकीय समीकरणे सारखी बदलू लागली आहेत. गेली दोन महिने संजयकाका आणि सगरे गटाची युती होणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र सोमवारी दुपारपासून सगळीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली राजकीय सगरे व संजयकाकांची मैत्री संपुष्टात आल्याची चर्चा असून संजयकाका पाटील यांनी स्वबळावर नगरपंचयातीसाठी एल्गार पुकारला आहे, तर विजयराव सगरे यांनी घोरपडे व आबा गटाला जवळ करून निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. या अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे संजयकाका गटाला सगरे यांनी निवडणुकीपूर्वीच शह दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे जयंत पाटील यांचेही या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. यामुळे निवडणूक चुरशीची होणार, हे स्पष्ट झाले आहे.