गोदाम, भवनासाठी पणनमंत्र्यांना साकड
By Admin | Published: January 18, 2015 11:45 PM2015-01-18T23:45:24+5:302015-01-19T00:30:15+5:30
समितीचे त्रिभाजन करा : चेंबर आॅफ कॉमर्सची मागणी े
सांगली : गोदाम, कोल्डस्टोअरेजच्या अभावाने व्यापारी, शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, यासह बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने पणन व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात यावे, अशीही मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोहर सारडा यांच्या नेतृत्वाखालील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मार्केट यार्ड व बाजार समितीमधील विविध समस्या त्यांच्यापुढे सादर केल्या. बाजार समितीला वर्षाला कोट्यवधी रुपयांचा सेस रूपाने कर मिळत असताना पायाभूत सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. विशेषत: हळद, गूळ व मका साठवणुकीसाठी अनेक समस्या निर्माण होत आहे. हरिपूर येथील पेव आता खराब झाले असून, हळद साठवणुकीच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर्षी हळदीचे उत्पादन मोठ्याप्रमाणात झाल्याने साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हळदीसाठी किमान दोन ते अडीच लाख पोत्यांच्या साठवणुकीसाठी गोदामाची गरज आहे. यावर्षी पाच हजार रुपये क्विंटलची हळद किडल्याने दीड हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ व्यापारी व शेतकऱ्यांवर आली आहे. हळदीसाठी जगप्रसिध्द असणाऱ्या सांगलीच्या बाजारपेठेत हळदीसाठी गोदाम नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती गूळ, मका व इतर शेतीमालाची आहे. बेदाण्यासाठीही कोल्डस्टोअरेज उभारण्याची गरज आहे.
बाजार समितीमध्ये आंध्र, तमिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतून सांगलीमध्ये शेतीमाल घेऊन शेतकरी येतात; मात्र त्यांच्यासाठी शेतकरी भवन उभारण्यात आलेले नाही. त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशीही
मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहे, हमालांसाठी विश्रांतीगृह, रस्ता, पाणी, वीज आदी सुविधांचीही मागणी करण्यात आली आहे.
सांगलीच्या बाजार समितीमध्ये कवठेमहांकाळ, जत तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ, जत तालुके आता सक्षम झाल्याने या समित्या आता सांगलीपासून वेगळ्या करण्यात याव्यात, अशीही मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
सांगली बाजार समितीची व्याप्ती आता वाढली असून, गोदाम, कोल्डस्टोअरेजसारख्या सुविधांची आज गरज आहे. यासाठी पणन मंत्र्यांकडे मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. हळदीची आवकही वाढली असून, त्यासाठी गोदामाची आज नितांत गरज आहे. यासाठी बाजार समितीला निधी देण्याची गरज आहे.
- मनोहर सारडा,
अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली