"देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग"

By संतोष भिसे | Published: March 12, 2023 05:28 PM2023-03-12T17:28:31+5:302023-03-12T17:29:49+5:30

 मिरज तालुक्यातील बेडग येथे दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते.

Gods may be shouting in the name of BJP says jayamt patil | "देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग"

"देवपण भाजपच्या नावाने ठणठण करत असतील, देवस्थाने लुटण्याचा भाजपचा उद्योग"

googlenewsNext

 

सांगली : भाजपचे नेते आता देवस्थानांच्या जमिनी ढापू लागले आहेत. महाराष्ट्रातील एकही देवस्थान सोडलेले नाही. देवपण त्यांच्या नावाने ठणठण करत असतील. बीडमध्ये सगळ्या देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचे काम एका भाजप नेत्याने केले आहे. हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन देवस्थाने लुटण्याचा उद्योग भाजपने सुरु केला आहे अशी टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल भाजपचा विरोध होता, तर नागालॅण्डमध्ये आमचा पाठींबा घेतलाच कशाला? असा सवालही त्यांनी केला.

बेडग (ता. मिरज) येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बुरसे, बापूसाहेब बुरसे, सुनील सूर्यवंशी, रेखा बुरसे, बाळासाहेब नलवडे आदींनी पक्षप्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, ॲड. बाबासाहेब मुळीक, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील, प्रदीप सावंत, तानाजी दळवी आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, सध्या सत्तेचा गैरवापर सुरु आहे. महागाईमुळे महिला भाजपच्या नावाने खडे फोडत आहेत. पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. पंतप्रधानांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरांची घोषणा २०१४ मध्येच केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात १० लाख कुटुंबांसाठी नमो घर योजना जाहीर केली. तुमच्या बॉसने यापूर्वीच घोषणा केली असेल, तर पुन्हा नमो घर योजना कशासाठी याचा जाब अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी विचारणार आहोत.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य ताब्यात राहणार नाही या भितीने आभाळाएवढ्या घोषणा सुरु आहेत. खिशात पैसे किती? याची माहितीच नाही. जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. आत्मविश्वास नसलेले सरकार काम करत आहे. मंत्र्यांना पहाटे झोपेतही कोणी विचारले, तर `देतो, देतो` म्हणताहेत.

सरकार पलटी झाल्यावर कालव्यांची कामे -
जयंत पाटील म्हणाले, मिरज तालुक्यात लघुवितरिकांची कामे आम्ही मंजूर केली होती. तोपर्यंत सरकार कोसळले. आता सध्याचे सरकार पलटी झाल्यावर राहिलेली कामे पूर्ण होतील. बेडग, आरगमध्ये ११०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा निर्णय झाला आहे.

जतमध्ये स्वतंत्र तलाव -
पाटील म्हणाले, जत तालुक्यासाठी स्वतंत्र तलावात पाणीसाठ्याचे नियोजन आहे. कालव्यातून सर्वत्र पाणी दिल्यानंतर तलावही भरला जाईल. त्यातून उन्हाळ्यातील टंचाई कमी होईल. जतसाठी सहा टीएमसी पाण्याची व्यवस्था केली आहे. कामाची निविदाही निघाली आहे. दीड-दोन वर्षांत पाणी सर्वत्र पोहोचेल.

मुश्रीफांवर धाडी टाकणारेही थकले -
पाटील म्हणाले, कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकणारेही आता थकले आहेत. सकाळी सात वाजताच धाडीसाठी येतात. अनिल देशमुख यांच्यावरही १०९ धाडी टाकल्या. अखेर कोर्टानेच याचा जाब विचारला. राजकीय खुनशीपणातून त्रास दिलेला जनतेला सहन होत नाही. योग्यवेळी अद्दल घडते. कसब्यामध्ये दिसून आले आहे. मुक्ता टिळकांचे घर सोडून भाजपने उमेदवारी दिली, त्यामुळे धंगेकर निवडून आले.
 

Web Title: Gods may be shouting in the name of BJP says jayamt patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.