व्यापाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार
By admin | Published: December 2, 2014 10:25 PM2014-12-02T22:25:54+5:302014-12-02T23:32:09+5:30
हणमंत पवार : ‘व्हॅट’पेक्षाही मोठा घोटाळा
सांगली : लोकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करून व्यापाऱ्यांनी स्वत:जवळ बाळगल्याने हा मध्यंतरीच्या हवाला घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे. तरीही महापालिका नागरी हितापेक्षा व्यापाऱ्यांचे हित पाहून कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे आयुक्त व व्यापारी यांच्याविरोधात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून रितसर कर गोळा केला आहे. त्यांचा व्यापारही चालू आहे. व्यवसाय करूनही त्यापोटीचा कर भरण्यास ते तयार नाहीत. २ हजारावर व्यापारी प्रामाणिकपणे कर भरत असताना अन्य व्यापाऱ्यांकडूनच का विरोध होत आहे? कर गोळा होत नसल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर व नागरी आरोग्यावर झाला आहे. गॅस्ट्रो व अन्य साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागण्यासही अप्रत्यक्षरित्या व्यापारीच कारणीभूत आहेत. त्यांनी कर भरला असता, तर प्रत्येक प्रभागात उपाययोजना व स्वच्छतेची कामे मार्गी लागली असती. ड्रेनेजची कामेही सध्या पैशाअभावी ठप्प आहेत. नगरसेवकांनी महापालिकेकडे विचारणा केल्यानंतर, वारंवार एलबीटी बहिष्काराचे कारण पुढे केले जाते. वास्तविक व्यापाऱ्यांनी टाकलेल्या या बहिष्कारामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. (प्रतिनिधी)