अन्यायाविरोधात मंत्रालयात जाणार
By admin | Published: April 12, 2017 10:52 PM2017-04-12T22:52:43+5:302017-04-12T22:52:43+5:30
सुगम-दुर्गम : खटाव तालुक्यातील दुर्गम शाळांचा फेरविचार करा; शिक्षक संघाची मागणी
पुसेगाव : विविध निकषांचा विचार करून सुगम व दुर्गम प्राथमिक शाळा निश्चित करताना तसेच त्या शाळांचा दर्जा ठरवताना खटाव तालुक्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून अन्याय झाला आहे. दि. १६ मार्च २०१७ रोजी या तालुक्यातील सुमारे ८० शाळा दुर्गम (अवघड क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या असतानाही केवळ ९ शाळांना अवघड क्षेत्र मानण्यात आले आहे. त्यामुळे या ९ शाळांव्यतिरिक्त अत्यंत दुर्गम शाळांत काम करणाऱ्या शिक्षकांवर बदलीबाबत अन्याय होणार आहे. प्रशासनाने याचा पुर्नविचार न केल्यास या तालुक्यातील पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच प्राथमिक शिक्षक संघ व समितीचे पदाधिकारी या अन्यायाविरोधात मंत्रालयात धाव घेणार आहेत.
गावात वाहन जात नाही ते गाव दुर्गम व ज्या गावात वाहन जाते ते गाव सुगम या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील गावे सोमवारी निश्चित करण्यात आली. त्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अंतिम मंजुरी ही दिली. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ७१६ शाळांपैकी ५२८ शाळांचा समावेश अवघड क्षेत्र (दुर्गम) तर २ हजार १८८ शाळांचा सुगम क्षेत्रात झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांसाठी अध्यादेश काढला असून, सुगम व दुर्गम या दोन वर्गातच बदल्या कराव्यात, असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे सुगम भागात १० वर्षे काम केलेल्यांना दुर्गममध्ये तर ३ वर्षे काम केलेल्यांना सुगम भागात बदली पात्र धरले जाणार आहे. जरी संबंधित गावे निवडण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असले तरी सुगम, दुर्गम गावांची माहिती प्राथमिक स्तरावर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांना किंवा संघ व समितीच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता ८० शाळा दुर्गम अवस्थेत असतानाही केवळ ९ शाळांची माहिती जिल्हा परिषदेकडे दिली आहे.
वास्तविक, खटाव तालुका हा डोंगरी भागात येतो. शासनाच्या विविध सवलतींसाठी हा तालुका अत्यंत दुष्काळी व दुर्गम असताना शिक्षणाच्याबाबतीतच या भागावर का अन्याय? शासनाने लावलेले दुर्गम भागाचे निकष पूर्ण करतील, अशा कित्येक शाळा या तालुक्यात आजही सुरू आहेत. प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम असणाऱ्या या शाळा आज शासनाच्या या फतव्यामुळे सुगम म्हणून घोषित करण्यात येत आहेत. त्यामुळे काळाच्या ओघात या सुगम समजल्या जाणाऱ्या या दुर्गम शाळा केवळ विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडतील. असा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दुर्गम भागात काम करण्याऱ्या शिक्षकाला सुगम भागातील शिक्षक समजून त्याला बदली केल्याने पुन्हा एकदा दुर्गम भागातच कामाला जावे लागणार आहे. त्यामुळे खटाव तालुक्याच्या बाबतीत दुर्गम असणाऱ्या शाळांचा फेर विचार व्हावा, अशी मागणी शिक्षक, पालक व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)