गावाबाहेर जाताय...कुलूपबंद घर सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:43+5:302021-09-27T04:28:43+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचे घराबाहेर पडणे वाढल्याने चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे ...
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचे घराबाहेर पडणे वाढल्याने चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येते. जुलैअखेरपर्यंत तब्बल २ कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. त्यामुळे शहर अथवा गावाबाहेर जाताना नागरिकांनी घराबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. बंद घर हेरून चोरटे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला मारत आहेत. जानेवारी ते जुलैपर्यंत जिल्ह्यात २३६ घरफोड्या झाल्या आहेत. त्यापैकी केवळ ४१ घरफोड्यांचाच छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या दीड वर्षात ६ कोटी रुपये किमतीचे दागिने व रोकडवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. अनेक मोठमोठ्या गृह निर्माण सोसायट्यात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक नसल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे परगावी जाताना घरातील किमती साहित्यांची काळजी घेण्याची गरज आहे.
चौकट
आठ महिन्यांत ३०० चोऱ्या
१. गेल्या आठ महिन्यांत ३०० हून अधिक घरफोड्या झाल्या आहेत. यात लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.
२. चोरट्यांकडून बंद घरावर पाळत ठेवली जाते. एक-दोन दिवसांपेक्षा अधिक घराला कुलूप असलेली घरे शोधून तिथे चोऱ्या होत आहेत.
३. अनेकजण परगावी जाताना घरात किंमती साहित्य ठेवतात. शेजाऱ्यांनाही कल्पना देत नाहीत. त्याचा फायदा चोरटे उचलत आहेत.
चौकट
५०० घटनांचा अजूनही तपास सुरूच
१. २०२० मधील ३०५ व २०२१ मधील १९५ अशा ५०० घरफोड्यांचा शोध अद्यापही सुरू आहे.
२. या दोन वर्षांत चोरट्यांनी जवळपास ६ कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे.
चौकट
अनलाॅकनंतर चोऱ्या वाढल्या
१. कोरोनामुळे गेली वर्षभर नागरिक घरातच आहेत. अनलाॅकनंतर बहुतांश लोक बाहेर फिरण्यासाठी जात आहेत.
२. कुटुंबासह बाहेर पडत असल्याने घराला कुलूपबंद केलेले असते. अशी घरे शोधून चोरटे डल्ला मारत आहेत.
चौकट
कोणत्या वर्षी किती घरफोड्या
२०२० : ४०३
२०२१ : २३६