लग्नासाठी मुलगी बघायला चाललोय, हवाय ई-पास...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:53+5:302021-06-09T04:32:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना आहे...जिल्हा बंदी आहे...पण म्हणून थांबून चालेल का? म्हणूनच या ना त्या कारणाने परजिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना आहे...जिल्हा बंदी आहे...पण म्हणून थांबून चालेल का? म्हणूनच या ना त्या कारणाने परजिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास मिळविण्यासाठी अनेक अफलातून कारणे सांगितली जात होती. अंत्यविधी आणि वैद्यकीय कारणासाठी सर्वाधिक पासची मागणी असली तरी शेजारच्या जिल्ह्यात मुलगी पाहायला चाललोय, पास हवाय, अशी मागणी करणारेही अर्ज पोलिसांकडे ऑनलाइन येत होते. अत्यावश्यक कारणांशिवाय आलेल्या अशा ५५ हजार ई-पासना पोलिसांनी परवानगी नाकारली.
कोरोना संसर्ग वाढतच चालल्याने राज्य शासनाने ईपासची सक्ती केली होती. नवीन आदेशानुसार रेड झोन वगळता इतर ठिकाणी पासची आवश्यकता असणार नाही; मात्र आतापर्यंत ई-पाससाठी अर्ज केलेल्या काहींनी भन्नाट कारणे देत पास मिळविण्याचा प्रयत्न केला.
वैद्यकीय कारणे व अंत्यविधीसारख्या घटनांसाठी योग्य असलेल्या अर्जास लगेच मंजुरी देण्यात येत होती.
यात काही जणांनी मुलगी पाहण्यासाठी पासची मागणी केली तर काहींनी पाहुण्यांकडे जाण्यासाठीही अर्ज केला. लग्न झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठीही अर्ज दाखल केले; मात्र असे पास नामंजूर करण्यात आले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ई पास मिळविण्यासाठी तुलनेने कमी त्रास झाला; मात्र नको त्या कारणांसाठी ऑनलाइन अर्ज आल्याने मंजूर करणाऱ्या पोलिसांची डाेकेदुखी मात्र वाढली आहे.
चौकट
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
* राज्य शासनाने गेल्या महिन्यात कडक निर्बंध लागू करताच ई-पास सक्तीचा करण्यात आला. त्यासाठी पोलिसांचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
* या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी कागदपत्रांमध्येही पोलिसांनी शिथिलता दिली. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या.
* ई-पाससाठी अर्ज करताना त्यात अत्यावश्यक कारणासाठीच पास मंजूर होत असे.
* यात अनेक जणांनी अफलातून कारणांचा उल्लेख केल्याचे दिसून आले. त्यामुळे अर्ज मंजूर झालाच, शिवाय त्यांनाही जिल्ह्याबाहेर जाता आले नाही.
चौकट
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
ई-पाससाठी अर्ज केलेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज हे मेडिकल इमर्जन्सीसाठी होते. सध्या कोरोनाचे वातावरण असल्याने व वैद्यकीय उपचारासाठी शेजारच्या अथवा अन्य जिल्ह्यात जाता येते, हा होरा लक्षात ठेवून सर्व जणच या कारणासाठीच अर्ज करत होते. वैद्यकीय कारणांसाठी अर्ज असल्याने त्यास मंजुरी मिळत असली तरीही सर्वाधिक अर्जदारांची मेडिकल इमर्जन्सी कशी, हा सवाल कायमच राहिला.
कोट
राज्य शासनाच्या सूचनेनुसार, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली ई-पास अर्जांची छाननी करून ते मंजूर करण्यात आले. अपूर्ण आणि चुकीच्या कारणांसाठी केलेेले अर्ज नामंजूर करण्यात आले. यासाठी कार्यरत पोलिसांनी कमी वेळेत अर्ज मंजुरी करत काम पूर्ण केले आहे.
संजय क्षीरसागर, सहा. पोलीस निरीक्षक, सायबर.
चौकट
ई-पास अर्जांची सद्यस्थिती
ई-पाससाठी अर्ज १२३०२४
मंजूर अर्ज ६७६७३
नामंजूर अर्ज ५५३५१