स्वस्तात सोन्याच्या आमिषाने अडीच लाखाला लुटले जतच्या सराफासह तिघांना मारहाण : दरोड्याचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:51 PM2018-06-28T21:51:22+5:302018-06-28T21:51:29+5:30
मिरज : तालुक्यातील एरंडोली येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने जत येथील सराफासह तिघांना मारहाण करून सुमारे अडीच लाखाचा ऐवज लुटण्यात आला. याप्रकरणी चार महिलांसह आठजणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत येथील साई ज्वेलर्स या दुकानाचे मालक बाळासाहेब शिंदे (रा. वळसंग, ता. जत) यांचे नातेवाईक दत्तात्रय जाधव (रा. हरिपूर) यांनी एरंडोली येथे स्वस्तात मिळत असलेल्या सोन्याबाबत माहिती दिली होती. दत्तात्रय जाधव यांना सुनील आवजी या परिचिताने एरंडोलीतील एका महिलेची भेट घालून देऊन तिच्याकडील सोन्याचा तुकडा तपासणीसाठी दिला होता. सोन्याचा तुकडा सांगलीत सोनाराकडे नेऊन तपासल्यानंतर तो अस्सल असल्याचे निष्पन्न झाल्याने जाधव यांनी बाळासाहेब शिंदे यांना २० हजार रुपये तोळा या दराने सोने मिळत असल्याचे सांगितले.
बाळासाहेब शिंदे शंभर ग्रॅम सोने खरेदीसाठी दोन लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी सांगलीत आले. स्वस्तात सोने देणाऱ्या महिलेने सोने देण्यासाठी गुरुवारी सकाळी आरग ते एरंडोली रस्त्यावरील शाबू फॅक्टरीजवळ येण्यास सांगितले. दत्तात्रय जाधव, बाळासाहेब शिंदे व त्यांचा मित्र रफिक जतकर मोटारसायकलवरून आरग येथे महिलेने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. महिलेने पैसे आणले आहेत का, अशी विचारणा केल्यानंतर शिंदे यांनी दोन लाखाची रक्कम दाखविली. महिलेने सोबत आणलेल्या डब्यातील सोने दाखविण्याचा बहाणा केल्यानंतर तेथे दबा धरून बसलेल्या दोन महिलांसह अन्य सहा जणांनी बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय जाधव व रफिक जतकर यांना काठीने मारहाण करून दोन लाख रुपये रोख रक्कम, मोबाईल, हातातील चांदीचे ब्रेसलेट, घड्याळ, रफिक जतकर यांच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याची चेन, मोबाईल, असा अडीच लाखाचा ऐवज लुबाडला. मारहाणीत जखमी बाळासाहेब शिंदे यांच्यासह तिघेजण मोटारसायकलवरून मिरजेच्या दिशेने आले. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करीत चोरट्यांचा आरग व एरंडोली परिसरात शोध घेतला. मात्र चोरटे फरारी झाले. सराईत टोळीतील गुन्हेगारांनी ही लूटमार केल्याचा संशय असून आठजणांविरुध्द ग्रामीण पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शिंदे यांच्यासह तिघांवर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.