मालकाविना एकटाच दूध वाहतूक करतोय सोन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:58 PM2019-06-24T12:58:45+5:302019-06-24T12:59:11+5:30
मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून काळमवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांचा सोन्या मालकाविनाच दररोज अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर कापत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात ४०० लिटर दुधाची वाहतूक स्वत:च करतो आहे. त्यामुळे साळुंखेंचा प्राणप्रिय सोन्या बैल परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
युनूस शेख
इस्लामपूर : मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून काळमवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांचा सोन्या मालकाविनाच दररोज अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर कापत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात ४०० लिटर दुधाची वाहतूक स्वत:च करतो आहे. त्यामुळे साळुंखेंचा प्राणप्रिय सोन्या बैल परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानले जाते. पूर्वी शेतीच्या कामात यांत्रिकीकरण नव्हते. त्यामुळे बैलच शेतकऱ्यांचा प्राण असायचा. तो त्यांच्या कुटुंबातील इतरांप्रमाणे कर्ताही असायचा. या सर्व जिव्हाळ्याच्या नात्यामधून शेतकरी बैलांमध्येच देवत्व पाहायचे. अलीकडच्या काळातील यांत्रिकीकरणाच्या झपाट्यातही असेच देवत्व जपले आहे, काळमवाडी येथील शिवाजी साळुंखे यांच्या शेतकरी कुटुंबातील सोन्या नावाच्या बैलाने.
शिवाजी साळुंखे (वय ६५) यांची गावापासून बाहेर वाटेगाव रस्त्यावर १० एकर शेती आहे. तर जवळपास ५० गार्इंचा गोठा आहे. त्यांची चार मुले सागर, सुदाम, सुधीर आणि सुनील सर्वजण शेती कामात मदत करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या देशी गाईचे सोन्या हे अपत्य.
आज सोन्या १२ वर्षांचा आहे. सोन्या चार वर्षाचा होता, तेव्हापासून तो साळुंखे यांच्यासोबत दुधाची वाहतूक करायचा. दूध घालण्यासाठी डेअरीकडे जाताना सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला सोन्याची रपेट व्हायची.
साळुंखे सांगतात, सात-आठ वर्षांपूर्वी एका प्रसंगी दूध घालण्यासाठी सोन्याला एकट्याला पाठवायचे, असा विचार मनात आला. सकाळी गावातील घरापासून सोन्या सवयीप्रमाणे गोठ्यावर आला होता. गाडीत ४० लिटरचे पाच कॅन म्हणजे २०० लिटर दूध ठेवले आणि कासरा सोन्याच्या अंगावर टाकला, त्याचक्षणी त्याने चालायला सुरुवात केली.
शेतातील अरूंद वाटेवरून जाताना त्याने दोन्ही बाजूला असणाऱ्या मका आणि उसाच्या पिकाला तोंडही लावले नाही. काळमवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आल्यावर डाव्या बाजूने आपली गाडी घेऊन निघाला. पुढे गावात देवळाजवळील वळण आणि अरूंद रस्त्यावरून जात डेअरीसमोर येऊन थांबला.
या घटनेने सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. त्यानंतर मोकळे कॅन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू करून तो शेतात गोठ्यावर आला. या प्रवासानंतर सुरू झालेला हा मालकाविना दुधाची वाहतूक करण्याचा सोन्याचा आवडीचा छंदच बनून गेला आहे.