सोने दरात घसरण, उलाढाल वीस टक्क्यांनी वाढली
By admin | Published: November 5, 2014 10:23 PM2014-11-05T22:23:22+5:302014-11-05T23:31:04+5:30
सांगली बाजारपेठ : आगामी दराबाबत संभ्रमावस्था, सोनेतारण व्यवहारावरही झाला मोठा परिणाम
अंजर अथणीकर - सांगली -सोने-चांदी दरामध्ये गेल्या आठवड्याभरात झालेल्या घसरणीमुळे येथील सराफ बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. आगामी दराबाबत मात्र संभ्रमावस्था असून, तारण व्यवहारावरही परिणाम झाला आहे.
सोन्याचा आजचा दर २५ हजार ९०० रुपये दहा ग्रॅम, तर चांदीचा दर ३६ हजार रुपये किलो होता. गेल्या आठ दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. दिवाळीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु झाली आहे. दिवाळीमध्ये सोन्याचा दर २७ हजार १००, तर चांदीचा दर ३९ हजार ४०० रुपये होता. दरातील घसरणीला आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे सराफांनी सांगितले.
दोन वर्षापूर्वी सोन्याचा दर २५ हजारापर्यंत खाली आला होता. त्यानंतर मात्र दरात वाढच होत गेली. ३२ हजारांपर्यंत सोन्याने मजल मारली होती. त्यानंतर सर्वाधिक काळ तीस हजारापर्यंत दर राहिला होता. बुधवारचा २५ हजार ९00 हा दर दोन वर्षातील सर्वात निच्चांकी दर आहे. चांदीचा दरही दोन वर्षात पहिल्यांदाच इतका खाली आला आहे.
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे सराफ बाजारामध्ये उलाढाल मात्र वाढली आहे. सोन्याच्या खरेदीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रोजची ४० ते ५० लाखांची उलाढाल वाढली आहे. काही ग्राहक अद्याप दर उतरतील, म्हणून ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहेत.
गहाणवट व्यवहारावरही परिणाम
सोन्याच्या गहाणवट व्यवहारावरही दरातील घसरणीचा परिणाम झाला आहे. यापूर्वी तीस हजार रुपये असणारा दर आता २६ हजाराच्या घरात आल्याने बँका, आर्थिक संस्था, परवानाधारक सावकार यांना अडचण निर्माण झाली आहे. सोन्याच्या दराच्या ८० टक्के कर्ज वाटप करण्यात येते. आता दर उतरल्याने सोन्यावर अधिक कर्ज वाटप झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जदारांना संस्था चालकांकडून सूचना देण्यात येत आहेत.
तीन महिन्यातील दर
दिनांकसोने चांदी
१ आॅगस्ट२८,१००४५,०००
२ सप्टेंबर२८,१२५४२,९००
१ आॅक्टोबर२७,१००४०,०००
२० आॅक्टोबर२७,६५०३९,४००
३१ आॅक्टोबर २६,९८०३८,६००
२ नोव्हेंबर२६,५००३७,५००
(दर सोने तोळा आणि चांदी किलोत)
सोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे व्यवसाय सुमारे पंधरा टक्के वाढला आहे. आंतरराष्ट्रीय कारणामुळे ही घसरण आहे. सध्यातरी दर वाढण्याची शक्यता नाही. आगामी दराबाबत काही सांगता येत नाही.
- किशोर पंडित, प्रदेश उपाध्यक्ष, सराफ असोसिएशन.