लाच म्हणून मागितली सोन्याची अंगठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:51 PM2018-12-21T23:51:59+5:302018-12-21T23:52:04+5:30
सांगली : मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वायफळे (ता. तासगाव) येथील गलई व्यावसायिकाकडे लाच म्हणून चक्क सोन्याच्या ...
सांगली : मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन वायफळे (ता. तासगाव) येथील गलई व्यावसायिकाकडे लाच म्हणून चक्क सोन्याच्या अंगठीची मागणी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत (रा. विजयनगर, सांगली) याच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर पथकाने ही कारवाई केली.
उत्तर प्रदेश राज्यातील माजीपूर येथे तक्रारदाराचा गलई व्यवसाय आहे. पुण्यात काही दिवस त्यांनी व्यायाम शाळेत प्रशिक्षक म्हणून नोकरी केली. त्यावेळी त्यांच्या मित्राने मोटार विक्रीसाठी त्यांना मध्यस्थ करुन घेतले होते.
या मित्राने एका ग्राहकास मोटार विकली, पण सर्व रक्कम मिळाल्याशिवाय नावावर करुन देणार नाही, असे सांगितले. पण हा ग्राहक बरेच दिवस आलाच नाही. त्यामुळे तक्रारदाराच्या मित्राने मोटार दुसऱ्याच ग्राहकाला विकली. हा प्रकार प्रथम व्यवहार केलेल्या ग्राहकाला समजला. त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार केली. पोलीस शिपाई सूर्यकांत सावंत याच्याकडे हे प्रकरण देण्यात आले होते.
सावंत याने मोटार विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थी केलेल्या तक्रारदारास चौकशीसाठी बोलाविले. तक्रारदाराने ‘माझा यामध्ये काही संबंध नाही’, असे सांगितले. त्यावेळी सावंत याने ‘तुला यातून बाहेर काढतो, मला काही तरी द्यावे लागेल’, असे सांगून लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधकच्या पुणे कार्यालयात तक्रार केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली असता, सावंत याने तक्रारदारास मोटार चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सोन्याच्या अंगठीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, श्यामसुंदर बुचडे, नवनाथ कदम, रुपेश माने, सूरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकी न ओळखल्याने ‘ट्रॅप’ अयशस्वी
सावंत याने तक्रारदारास १ आॅक्टोबर २०१८ रोजी सोन्याची अंगठी घेऊन विजयनगरमध्ये सत्राळकर कॉम्प्लेक्स येथे येण्यास सांगितले होते. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तेथे सापळा लावला. सावंत याने सोन्याची अंगठी शासकीय दुचाकीच्या हेडलाईटच्या काचेजवळ ठेवण्यास सांगितले होते. परंतु तक्रारदारास ही शासकीय दुचाकी ओळखता आली नाही, त्यामुळे अंगठीही ठेवता आली नाही. त्यामुळे हा सापळा अयशस्वी ठरला.