सोने-चांदी गलाई व्यावसायिक तरुणाचा भोकसून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 05:35 PM2020-07-19T17:35:12+5:302020-07-19T17:38:27+5:30
उत्तर प्रदेशमधील सोने-चांदी गलाई दुकानातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणातून गलाई व्यावसायिक महादेव रघुनाथ माळी (वय २९, रा. माळी मळा, देविखिंडी रोड, माधळमुठी) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला.
विटा : उत्तर प्रदेशमधील सोने-चांदी गलाई दुकानातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणातून गलाई व्यावसायिक महादेव रघुनाथ माळी (वय २९, रा. माळी मळा, देविखिंडी रोड, माधळमुठी) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला.
ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास माधळमुठी (ता. खानापूर) येथे घडली. याप्रकरणी संशयित विश्वास ऊर्फ राहुल किसन माळी (२४, रा. माधळमुठी) या गलाई व्यावसायिक तरुणाला विटा पोलिसांनी अटक केली आहे.
माधळमुठी येथील महादेव माळी व संशयित विश्वास ऊर्फ राहुल माळी या दोघांचा उत्तर प्रदेशमधील सुजानगंज येथे भागीदारीत सोने-चांदी गलाई व्यवसाय आहे. हे दोघेही एकाच भावकीतील आहेत. मात्र व्यवसायातून दोघांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.
सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने हे दोघेही गावी माधळमुठी येथे आले होते. शनिवारी रात्री महादेव यांनी भागीदारी व्यवसायातील पैसे व दुकानातील साहित्य राहुल यास परत मागितले. त्यावेळी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास राहुल माळी याने महादेव यांच्या घरात जाऊन त्यांच्याशी वाद घातला.
या वादात राहुल याने महादेव यांना त्यांच्या घरातून बाहेर ओढून त्यांच्या छातीवर व पोटावर शस्त्राने हल्ला केला. यात महादेव गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यानंतर राहुलने घटनास्थळावरून पलायन केले.
पोलिसांनी शोधमोहीम हाती घेऊन रात्री उशिरा संशयित राहुल माळी यास लेंगरे (ता. खानापूर) येथे अटक केली. याप्रकरणी मृत महादेव यांची पत्नी राजाक्का माळी यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे पुढील तपास करीत आहेत.