खैरावच्या भारत निर्माण योजनेत गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:56+5:302021-07-02T04:18:56+5:30
जत : जत तालुक्यातील खैराव येथील भारत निर्माण योजना पूर्ण झालेली नसताना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून बिले उचलली आहेत. ...
जत : जत तालुक्यातील खैराव येथील भारत निर्माण योजना पूर्ण झालेली नसताना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवून बिले उचलली आहेत. याप्रकरणी ठेकेदार, सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा १२ जुलैला जत पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा खैराव येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चौगुले व ग्रामस्थांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
खैरावला भारत निर्माण योजना २०१२-१३ मध्ये मंजूर झाली होती. संबंधित ठेकेदाराने कामे न करता ६७ लाखांची बिले उचलली आहेत. कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या योजनेतून ज्या भागात पाणी जायला हवे होते तेथे पाणी गेलेलेच नाही ही वस्तुस्थिती आहे. पाण्याची जी टाकी बांधण्यात आलेली आहे, ती निकृष्ट बांधलेली आहे. पाईपलाईन तीन फूट खाली न घालता वरच ठेवली आहे. भविष्यात ही पाईपलाईन फुटू शकते.
या सर्व कामांची पाहणी करून ठेकेदार, खैरावचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चौगुले व ग्रामस्थांनी केली आहे.