शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज... कृषिपंपांची वीजजोडणी महिन्याभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:11+5:302021-01-17T04:23:11+5:30
सांगली : महावितरणकडे ३१ मार्च २०१८पर्यंत पैसे भरूनही वीजजोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ जोडणी मिळणार आहे. तीस मीटरच्या आतील ...
सांगली : महावितरणकडे ३१ मार्च २०१८पर्यंत पैसे भरूनही वीजजोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ जोडणी मिळणार आहे. तीस मीटरच्या आतील कृषिपंपांची जोडणी ३० दिवसांत आणि दोनशे मीटरच्या आतील जोडणी तीन महिन्यांत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरणने घेतला आहे. मोबाइल ॲपव्दारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून, याचा जिल्ह्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वीजजोडणीसाठी पैसे भरूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षांत वीजजोडणीच मिळाली नव्हती. विहिरीमध्ये पाणी असूनही उभी पिके वाळून जात आहेत. याबद्दल शेतकऱ्यांनी महावितरणकडे तक्रारी करताना मोर्चेही काढले होते. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. याची दखल घेत महावितरणने तीस मीटरच्या आतील वीजजोडणी तत्काळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधाही महावितरणच पुरविणार आहे.
महावितरण कंपनीने पैसे भरून प्रलंबित असलेल्या, नवीन अर्ज केलेले आणि सध्या वापर असलेल्या सर्व कृषिपंपांचे सर्वेक्षण मोबाइल ॲपव्दारे सुरू केले आहे. ही सर्व माहिती संगणकाव्दारे अद्ययावत करण्यात येणार आहे. या माहितीचा फायदा नवीन वीजजोडणी आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी होणार आहे. लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीसाठी किती अंतर आणि किती खांब लागणार आहेत, नवीन वीजजोडणीसाठी रोहित्राची तेवढी क्षमता आहे का, यासह विविध माहिती सर्वेक्षणामध्ये घेतली जात आहे. हे काम बुधवार, २० जानेवारीपर्यंत संपणार आहे. त्यानंतर ३० मीटरच्या आतील प्रलंबित कृषिपंपांना तीस दिवसात वीजजोडणी दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भरून प्रलंबित आहे आणि नवीन अर्जदारांच्या कृषिपंपाचे अंतर लघुदाब वाहिनीच्या अंतरापासून २०० मीटरच्या आत आहे, तेथील रोहित्राची क्षमताही तेवढी असेल तर तीन महिन्यांच्या आत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन जोडणी करण्याचे आदेश आहेत.
चौकट
मुख्य अभियंत्यांची नियुक्ती
नवीन कृषिपंपाची वीजजोडणी प्रभावी, जलद गतीने होण्यासाठी आणि थकबाकी वसुलीची विशेष मोहीम राबविण्यासाठी महावितरण कंपनीने स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार केला आहे. या कक्षाच्या प्रमुख म्हणून मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.