जतमध्ये पाण्यासाठी महिन्यात गोड बातमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:57 PM2017-09-02T23:57:05+5:302017-09-02T23:58:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्याच्या पूर्व भागाला कर्नाटकातून पाणी मिळावे, यासाठी महाराष्टÑ शासन सतत प्रयत्नशील आहे. कर्नाटकाला साडेचार टीएमसी पाणी सोडून त्याच्या बदल्यात जत तालुक्याला पाणी मिळावे, यासंदर्भात प्राथमिक चर्चा शासनस्तरावर झाली आहे. परंतु त्यास अंतिम स्वरूप प्राप्त झाले नाही. येत्या एक महिन्यात त्यासंदर्भात गोड बातमी आपल्यापर्यंत येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अंकले (ता. जत) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प म्हैसाळ योजनेच्या जत भागातील पंपगृह व उर्ध्वगामी नलिका टप्पा क्रमांक ६ (अ) च्या अंकले (ता. जत) येथील कामाचा प्रारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात येणार होता. परंतु ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री उशिरा अंकले येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यासंदर्भात येत्या दीड महिन्यात अनुकूल असा निर्णय होईल, असे सांगून मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेचे अपूर्ण काम येत्या एका वर्षात पूर्ण होणार आहे. शेतीचा विकास व पाणी पुरवठा योजना यासाठी जास्तीत जास्त निधी खर्च केला जाणार आहे. निधी उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीच अडचण निर्माण होणार नाही.
वाळेखिंडी, नवाळवाडी, बेवनूर, बागलवाडी या चार गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव व अॅड. प्रभाकर जाधव यांनी मागणी केली. शासन स्तरावर पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आ. विलासराव जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खा. संजयकाका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आ. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, रमेश शेंडगे, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता टी. एन. मुंढे, कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, जत पंचायत समितीच्या सभापती मंगल जमदाडे, जि. प. शिक्षण समिती सभापती तम्मणगौडा रवी-पाटील व श्रीदेवी जावीर, रामाण्णा जिवन्नावर, संजय सावंत, प्रकाश जमदाडे, सरदार पाटील, प्रमोद सावंत, शिवाजीराव ताड, महादेव पाटील, कुंडलिक दुधाळ, शिवाप्पा तावशी, उमेश सावंत, सुनील पवार उपस्थित होते. भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी यांनी आभार मानले.