खूषखबर...चिऊतार्इंची संख्या वाढली! सांगली शहरात १२ हजार ४०३ चिमण्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:40 PM2018-03-19T23:40:12+5:302018-03-19T23:40:12+5:30
सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत
सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र, सांगली शहरातील पक्षीप्रेमींनी एकत्र येत यंदा केलेल्या पाहणीत शहरात चिमण्यांची संख्या वाढली असून, १२ हजार ४०३ चिमण्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी शहरात ३ हजार १७० चिमण्यांची नोंद झाली होती.
जिथे मानवाची वस्ती, तिथे चिमण्यांचीही वस्ती, असे समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चिऊतार्इंच्या वास्तव्याचाच प्रश्न गंभीर बनत चालल्याने चिवचिवाट कमी ऐकू येत होता. घरट्यांची संख्याही कमी असल्याने अडचणी वाढल्या होत्या. यावर उपाय म्हणून खोपा बर्डस् हाऊसतर्फे शाळांमध्ये एक हजार घरटी मोफत दिली आहेत.
शहरातील चिमण्यांची नेमकी संख्या किती, हा औत्सुक्याचा विषय असल्याने गेल्या पंधरवड्यात ‘खोपा बर्डस् हाऊस’ व ‘बर्डसॉँग’ संस्थेतर्फे शहरातील १३ शाळेतील ४३५ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी चिमण्यांचे निरीक्षण केले होते. त्या नोंदीचा अहवाल तयार केला. त्यानुसार शहरात १२ हजार ४०३ चिमण्या असल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी शहरातील ११ शाळेतील १८४ विद्यार्थ्यांनी निरीक्षण नोंदविले होते. त्यात ३ हजार १७० चिमण्यांची नोंद झाली होती.
सांगली शहरात खोपा बर्डस् हाऊस व बर्ड सॉँग संस्थेतर्फे चिमण्यांची गणना करण्यात आली. यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. जेणेकरून त्यांचे पक्ष्यांविषयीचे कुतूहल जागृत रहावे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर तयार केलेल्या घरट्यांची संख्या ६ हजारवर गेली आहे. चिमण्यांसाठी घरटी मिळाल्यानेही चिमण्यांची संख्या वाढली आहे.
- सचिन शिंगारे, पक्षी निरीक्षक
व संयोजक.