नागज फाट्यावर गुटख्यासह सव्वा कोटीचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:42 PM2023-04-30T21:42:36+5:302023-04-30T21:43:02+5:30

कर्नाटकातून पुण्याकडे दोन ट्रकमधून अवैध वाहतूक

Goods worth half a crore including Gutkha seized at Nagaj Phata | नागज फाट्यावर गुटख्यासह सव्वा कोटीचा माल जप्त

नागज फाट्यावर गुटख्यासह सव्वा कोटीचा माल जप्त

googlenewsNext

महेश देसाई

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे दोन कंटेनर ट्रकमधून जाणारा गुटखा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कवठेमहांकाळ पोलिसांनी रविवारी पकडला. गुटख्यासह एक कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन चालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिपुराया संगाप्पा बमनोळी (वय २६), बसवेश्वर टोपण्णा कटीमनी (वय २६, दोघे रा. करजगी, ता. जत) व श्रीशैल तमाराया हळके (वय ३०, रा. लहान उमदी, सुसलाद रोड, ता. जत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

कर्नाटकातून दोन कंटेनरमधून गुटख्याची पुणे येथे वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस हवालदार दीपक गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, तसेच पुढे सातारा मार्गे ही वाहतूक पुण्याकडे केली जाणार होती. या आधारे पोलिसांनी नागज फाटा येथे सापळा लावला. वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी दोन ट्रकमधून (क्र. एमएच ०४, ईबी ०४८९ व एमएच १२, आरएन ३२०३) गुटख्याने भरलेल्या पोत्यांची वाहतूक सुरु असल्याचे निदर्शनास आले. ही दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणत चालकासह तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्या समक्ष गुटख्याचा पंचनामा केला. ही कारवाई कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र जाधव, संजय पाटील, दीपक गायकवाड, नागेश खरात, पोलिस नाईक संदीप नलवडे, पोलिस कॉन्स्टेबल विनायक सुतार, रुपेश होळकर, चंद्रसिंह साबळे यांनी केली.

Web Title: Goods worth half a crore including Gutkha seized at Nagaj Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.