‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 12:57 PM2022-06-13T12:57:05+5:302022-06-13T12:57:38+5:30
दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध
सांगली : दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याबद्दल गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा रिपब्लिकन स्टुडंट युनियनने आज, सोमवारी निषेध करीत निदर्शने केली.
युनियनचे प्रमुख अमोल वेटम व स्वप्नील खांडेकर यांनी याबाबतचे निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, एक्वॅलिटी हबच्या प्रमुख व दलित नागरी हक्क कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे अमेरिकेत ‘गुगल’च्या प्लॅटफॉर्मवर चर्चासत्र आयोजित केले होते. गुगलमधील वरिष्ठ अधिकारी तनुजा गुप्ता यांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते.
‘गुगल’मधील ८ हजार मनुवादी कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे हे चर्चासत्र रोखण्याची मागणी केली आणि पिचाई यांनी या महिला दलित वक्त्याला हिंदूविरोधी संबोधित करून त्यांचे नियोजित चर्चासत्र रद्द केले. या घटनेचा संपूर्ण जगात निषेध होत आहे. त्यामुळे सुंदर पिचाईंसह ८ हजार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात स्टुडटंस युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्नील खांडेकर, तानाजी जाधव, राम नंदीवाले, निशाताई बचूटे, रोहित वाघमारे, बाबासो तांबे, शिवराज गडदे, आरपीआयचे उपाध्यक्ष दिनेश साबळे आदी उपस्थित होते.